काश्‍मीरमध्ये हिमवृष्टीचा कहर..विमानसेवा विस्कळीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जानेवारी 2021

काश्‍मीरच्या बहुतांश भागात रविवारी हिमवृष्टी झाल्याने किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. हवामान बदलामुळे श्रीनगरची विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

श्रीनगर  :  काश्‍मीरच्या बहुतांश भागात रविवारी हिमवृष्टी झाल्याने किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. हवामान बदलामुळे श्रीनगरची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. लगतचे राज्य हिमाचलमध्ये हिमवादळ येण्याचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये अनेक भागात पावसाने हजेरी लावली, तर मध्य प्रदेशमध्येही भोपाळमध्ये आज पावसाने तुरळक हजेरी लावली. तेथे कालपासून ढगाळ वातावरण होते. बिहारमध्ये किमान तापमानापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

श्रीनगरमध्ये रविवारी तीन ते चार इंच हिमवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये या वर्षातील पहिली आणि हंगामातील दुसरी हिमवृष्टी झाली. काझीगुंदमध्ये तर ९ इंचापर्यंत हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. पहेलगाम येथे ५ ते ६ इंच बर्फ पडला. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर जवाहरलाल बोगद्याजवळ १० इंच हिमवृष्टी झाल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाली. श्रीनगर-लेह आणि शोपियॉं, पूंच जिल्ह्याला जोडणारा मुघल रोड देखील हिमवृष्टीमुळे बंद राहिला.  गुलमर्ग येथे ४ सेंटीमीटर तर कुपवाडा येथे ३.५ सेंटीमीटर हिमवृष्टी झाली. श्रीनगरच्या तापमानात उणे ०.९ सेल्सिअसपर्यंत घसरण झाली. पहेलगाम येथे उणे ६.७, गुलमर्ग येथे उणे ५.०, काझिगुंद येथे उणे ०.३, कुपवाडा येथे उणे ०.३ आणि कोकेनर्ग येथे उणे १.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

संबंधित बातम्या