आतापर्यंत देशात 'इतक्या' जणांना मिळाली कोरोनाची लस 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

कोरोना विषाणूच्या विरोधातील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे.

कोरोना विषाणूच्या विरोधातील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी रोजी भारतात लसीकरण मोहीम सुरू केली होती. त्यानंतर मंद गतीने सुरू झालेली लसीकरण मोहीम आता चांगलाच जोर पकडू लागल्याचे दिसत आहे. कारण 16 जानेवारी पासून ते आतापर्यंत  28,613 सत्रात 16 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार शनिवारी केवळ 3,512 सत्रांमध्ये 1.91 लाख जणांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. 

कोरोना लसीची मोहीम सुरु झाल्यानंतर, लस दिलेल्यांपैकी एकूण 1,283 जणांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. व ही आकडेवारी लसीकरणाच्या केवळ ०.०8 टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याशिवाय केवळ 11 जणांना म्हणजेच 0.0007 टक्के लोकांना लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तर लस दिल्यानंतर आतापर्यंत एकूण 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोणत्याही मृत्यूचे कारण लसीकरण संबंधित आढळले नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

कोरोनाची लसीकरण मोहीम चालू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात काहीशी मंदपणे सुरु झालेली मोहीम हळूहळू वेग पकडत आहे. कोरोना लसीसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या कोविन डेटाबेसमधील बदलांमुळे वॉक-इन लसीकरणासाठी परवानगी देण्यात आल्यामुळे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याचे समोर येत आहे. सध्याच्या स्थितीला देशात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोनावरील लस देण्यात येत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोविशील्ड ही लस अ‍ॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आहे. तर कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी एकत्रित मिळून बनवलेली आहे.   

संबंधित बातम्या