स्त्रीजन्माबाबतीत समाज अद्याप उदासीन

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

‘यूएन’चा अहवाल; जगातील एकतृतीयांश ‘बेपत्ता’ महिला भारतात

 

न्यूयॉर्क

गेल्या पन्नास वर्षांत जगभरात लोकसंख्येतून १४.२६ कोटी महिला ‘बेपत्ता’ असून, त्यापैकी एकट्या भारतात ४.५८ कोटी महिला ‘बेपत्ता’ असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. चीनमध्ये हे प्रमाण भारताहून बरेच अधिक आहे.
गर्भलिंग परीक्षण, गर्भपात तसेच अर्भकहत्या, अशा कारणांमुळे एकूण लोकसंख्येतून महिलांचे प्रमाण कमी होणे, अशी ‘बेपत्ता’ महिलांची व्याख्या आहे. संयुक्त राष्ट्राने जागतिक लोकसंख्येची स्थिती, असा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जगात महिलांचे कमी होण्याचे प्रमाण गेल्या पन्नास वर्षांत जवळपास दुप्पट झाले आहे. १९७० मध्ये जगात ६.१० कोटी महिला लोकसंख्येतून ‘बेपत्ता’ होत्या, तर २०२० मध्ये हीच संख्या १४.६ कोटी झाली आहे. भारत आणि चीन या दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांत मिळूनच महिला ‘बेपत्ता’ होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. चीनमध्ये ७.२३ कोटी महिला लोकसंख्येतून बेपत्ता आहेत. एका विश्‍लेषणानुसार, वंशाला दिवा हवाच, या हट्टापायी बेकायदा गर्भलिंग परीक्षण करून किंवा भ्रूणहत्या करून मुलींच्या जन्माला विरोध केला जात आहे. हा प्रकार चीन आणि भारतात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत भारतातील लोकसंख्येतून चार लाख साठ हजार महिला ‘बेपत्ता’ झाल्या. यातील दोनतृतीयांश घटना स्त्रीजन्माला विरोध केल्याने आणि एकतृतीयांश घटना अर्भकहत्या केल्याने घडल्या आहेत.

भारत सरकारचे प्रयत्न
समाजाचा स्त्रीजन्माबाबतचा दृष्टिकोन बदलण्यासाठी भारत सरकारकडून विशेष प्रयत्न होत असल्याची दखलही संयुक्त राष्ट्रांनी घेतली आहे. मुलींचे महत्त्व, त्यांचे कर्तृत्व, महिलांमुळे समाजात घडत असलेला सकारात्मक बदल, याबाबत समाजात माहिती दिल्याने समाजाची मानसिकता बदलण्यास मदत होत आहे, असे अहवालात नमूद केले आहे. तसेच, मुलींना मोफत शिक्षण आणि इतर विविध सवलती देत सरकारने कुटुंबांना आर्थिक पाठबळही दिले, असे अहवालात म्हटले आहे.

विवाहात अडचणी
लोकसंख्येत महिलांचे प्रमाण कमी असल्याने अनेक देशांमध्ये मुलांना विवाहासाठी अडचणी येत आहेत. यामुळे काही ठिकाणी बालविवाहासारखे प्रकारही घडू शकतात, असा इशारा अहवालात दिला आहे. भारतात २०५५ मध्ये विवाह जमण्यातील अडचणींचे प्रमाण सर्वाधिक असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतात वयाची पन्नाशी आली, तरी लग्न न जमलेल्यांची संख्या २०५० नंतर वेगाने वाढून ती १० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

‘यूएन’च्या अहवालानुसार...
- भारतात दर एक हजार स्त्रीजन्मामागे १३.५ मृत्यू
- यापैकी बहुतांश बालिकांची हत्या
- ‘बेपत्ता’ महिलांमध्ये चीन, भारत अव्वल
- मुलांच्या विवाहात अडचणी

संबंधित बातम्या