सौर उर्जा भारतीय रेल्वेला संपूर्ण हरित वाहतूक पद्धत बनवणार

pib
मंगळवार, 7 जुलै 2020

या सर्व महत्वाच्या गोष्टींना आरंभ करून भारतीय रेल्वे हवामान बदलाचे आव्हान यशस्वीपणे स्विकारत आहे आणि नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले टाकत आहे तसेच त्याद्वारे भारताचे संकल्पित राष्ट्रीय उद्दिष्ट (INDC) गाठण्यात आपले योगदान देत आहे.

नवी दिल्ली, 

पंतप्रधानांच्या सुचनेनुसार उर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एक नव्या उपक्रमाचा आरंभ करत आहे. रिक्त जागांचा वापर नवीकरणीय उर्जा प्रकल्पासाठी करत, त्याद्वारे मिळणारी सौर उर्जा रेल्वे स्थानकांसाठी वापरण्याचा रेल्वेचा विचार आहे. कर्षणशक्तीसाठी लागणारी उर्जा सौर उर्जेद्वारे निर्माण करून त्याद्वारे आवश्यकता पूर्ण करत संपूर्णपणे ‘हरित वाहतूकव्यवस्था’ बनण्याच्या दिशेने रेल्वे पावले टाकत आहे.   

रेल्वे मंत्रालयाने रिक्त आणि वापर नसणाऱ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे.

सौर ऊर्जेचा वापर हा भारतीय रेल्वेचे  'नेट झिरो कार्बन उत्सर्जन रेल्वे’त रुपांतर करण्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे उद्दिष्ट साध्य करेल. 

या अस्तित्वात येणार्‍या सोलर प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याची उर्जेची मागणी पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे उर्जेच्या बाबतीत स्वावलंबी असणारी रेल्वे ही पहिली वाहतूक व्यवस्था ठरेल. भारतीय रेल्वेला ‘हरित रेल्वे’ तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी याचा उपयोग होईल. 

हरित ऊर्जेच्या उपयोगाचे रेल्वे हे एक महत्त्वाचे, पथदर्शक उदाहरण ठरेल.  रेल्वेने विविध सौर प्रकल्पांमधून ऊर्जा  मिळवण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ MCF रायबरेली (उत्तर प्रदेश) येथे उभारण्यात आलेल्या 3MWp सौर प्रकल्प.  भारतीय रेल्वेने विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वेच्या इमारतींवर  100 MWp क्षमतेचे सौर प्रकल्प याआधीच सुरू केले आहेत.

याखेरीज बिना (मध्य प्रदेश) येथे 1.7 MWp  क्षमतेचा रेल्वे प्रकल्प उभारलेला आहे, जो थेट ओवरहेड ट्रॅक्शन सिस्टिमला ऊर्जा पुरवेल. हा प्रकल्प सध्या विस्तृत चाचण्यांच्या टप्प्यात असून येत्या पंधरा दिवसात  सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे आणि भेल भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड यांनी संयुक्तरीत्या उभारलेला हा कल्प हा जगातील या तर्‍हेचा पहिलाच प्रकल्प आहे. डायरेक्ट करंट (DC) हा सिंगल फेस अल्टरनेटिंग करंट मध्ये रुपांतरीत करून रेल्वेच्या ओवरहेड  ट्रॅक्शन सिस्टीमला पुरवण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग या प्रकल्पात करण्यात आला आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प बिना ट्रॅक्शन सब स्टेशन (TSS) च्या जवळ उभारण्यात आला आहे.  वर्षाला जवळपास 25 लाख युनिट उर्जा हा प्रकल्प निर्माण करू शकेल आणि दरवर्षी रेल्वेचे सुमारे 1 कोटी 37 लाख रुपये वाचवेल.

भारतीय रेल्वे (IR) आणि  BHELच्या अधिकाऱ्यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीसाठी अथक यशस्वी प्रयत्न केले.  BHELने  सामाजिक दायित्व  म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी (CSR) अंतर्गत या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली होती.  covid-19 लॉक डाउन , त्यामुळे सलग येणाऱ्या अडचणी, सामान तसेच मनुष्यबळ मिळवताना येणाऱ्या अडचणी याला तोंड देत भारतीय रेल्वे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांनी एकत्रितपणे  उत्कृष्ट काम केले. त्यामुळे 9 ऑक्टोबर 2019 ला करारावर स्वाक्षर्‍या होऊन सुरू झालेले हे कार्य फक्त आठ महिन्यात पूर्णत्वास गेले.  सौर पॅनेल ने तयार झालेली डीसी पॉवर ही  रेल्वे ट्रॅक्शन प्रणालीला लागणाऱ्या 25KV AC  सिंगल फेज मध्ये रूपांतरित करणे हे यातील सर्वात मोठे आव्हान होते त्यासाठी सिंगल फेस आउटपुटला  उच्च क्षमतेचे इन्व्हर्टर असणे आवश्यक होते .

अशा तऱ्हेचे उच्च क्षमतेचे सिंगल फेज आऊटपुट इन्व्हर्टर्स बाजारात तयार उपलब्ध नसतात.  सोलर पॅनलने तयार केलेली डीसी ऊर्जा या वैशिष्टपूर्ण इन्व्हर्टरच्या सहाय्याने AC उर्जेत रूपांतरित करून आणि त्यानंतर  त्याची  क्षमता 25 kV  AC -1 पर्यंत  नेऊन  ट्रांसफार्मरद्वारे BINA TSS LA पुरवून त्याद्वारे विजेवर चालणाऱ्या गाड्या चालवल्या जातील.

याशिवाय भारतीय रेल्वेची इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसाठीच्या उर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन जमिनीवरील सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यापैकी 50 MWp क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प भिलाई (छत्तीसगड) येथे वापरात नसलेल्या जागेवर उभारण्यात आला आहे. तो सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी (CTU) ला जोडण्यात येईल.  हा प्रकल्प 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे . दिवाना (हरियाणा) येथे 20 MWp सौर प्रकल्प होत आहे. हा स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी ला जोडण्यात येणार असून,  31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे उर्जा व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (REMCL) ही सौरऊर्जेचा वापर वाढत्या प्रमाणावर करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्न करत आहे.   वापरात नसलेल्या रेल्वेच्या जमिनींवर 2 GW सौरऊर्जा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी उभारून देण्यासाठीच्या निविदा त्यांनी नुकत्याच जारी केल्या आहेत. कार्यरत रेल्वे मार्गासाठी सौर प्रकल्प उभारण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पनेवरही भारतीय रेल्वे काम करत आहे.  यामुळे रेल्वे जमिनीवरच्या अतिक्रमणांना आळा बसेल त्याचप्रमाणे रेल्वे गाड्यांचा वेग वाढणे, तसेच सुरक्षितता आणि ट्रॅक्शन नेटवर्कला सौर ऊर्जेचा थेट पुरवठा केल्यामुळे मूलभूत सोयीसुविधांवर होणाऱ्या खर्चाची बचत असे अनेक फायदे होतील. REMCL कडून 1 GW क्षमतेच्या सौर प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणखी एक निविदाही लवकरच निघणार आहे.

 

संबंधित बातम्या