सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय

पीटीआय
रविवार, 30 ऑगस्ट 2020

राज्यघटना आणि देशातील लोकशाही संकटात असून काही विघातक मंडळी लोकांमध्ये द्वेषाचे विष पसरवून त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: राज्यघटना आणि देशातील लोकशाही संकटात असून काही विघातक मंडळी लोकांमध्ये द्वेषाचे विष पसरवून त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. देशातील लोकशाहीवादी संस्था नष्ट होऊ लागल्या असून हुकूमशाहीचा प्रभाव वाढतो आहे असेही गांधी यांनी नमूद केले.

‘‘स्वातंत्र्याची लढाई लढताना आम्ही जो संकल्प केला होता, तो पूर्ण करण्यासाठी आणखी मोठा लढा द्यावा लागणार आहे. लोकांमध्ये भांडण लावणाऱ्या शक्ती देशामध्ये द्वेषाचे विष पसरविण्याचे काम करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील धोक्यात आले असून लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. देशातील सामान्य जनता, आदिवासी, महिला, तरुण यांचा गळचेपी केली जात असून देशाचे तोंड दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचेही सोनिया यांनी नमूद केले. छत्तीसगडमध्ये विधिमंडळाचे नवे सभागृह उभारले जात असून त्याचा पायाभरणी समारंभ आज सोनियांच्या उपस्थितीत ऑनलाइन पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले.

काँग्रेसचे फेसबुकला पत्र
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा फेसबुकचे  संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना प्रतिबंध करण्यासाठी द्वेषमूलक विधानविरोधी नियमांचा अवलंब करण्यात आला की नाही अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी फेसबुककडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. कायदेशीर कारवाईसाठी काही पावले उचलली जात आहेत का?  खासगी लाभासाठी एखादी परकीय कंपनी सामाजिक सौहार्दाला क्षती पोचवू शकत नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.

आमचा नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास :जितीनप्रसाद
नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलांचा आग्रह धरल्याने  निष्ठावंतांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले वरिष्ठ नेते जितीनप्रसाद यांनी आज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खदखद व्यक्त केली. आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पक्षाच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्‍वास असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले. पक्षाने आत्मपरीक्षण करत कार्यपद्धतीमध्ये बदल घडवून आणावा म्हणून आम्ही हे पत्र लिहिले होते. पक्षाच्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करण्याचा हेतू नव्हता. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये मी नेमकी हित बाब बोलून दाखविली होती. माझ्या पत्राचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावण्यात आला असेही प्रसाद यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या