काँग्रेसचे आता ‘शेतकऱ्यांसाठी बोला’

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

राहुल यांचे जनतेला मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध तीव्र करण्यासाठी कॉंग्रेसने आता ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ (शेतकऱ्यांसाठी बोला) ही मोहीम सोशल मीडियावर  सुरू केली असून पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी  काँग्रेसच्या  या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 

संसदेत कृषी सुधारणा विधेयकांना विरोध केल्यानंतर आता संसदेबाहेरही पक्षाची आक्रमकता कायम ठेवण्यासाठीच्या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसच्या या मोहिमेकडे पाहिले जाते.  “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन विरोध करावा”, असे ट्विट करून राहुल गांधींनी आज या मोहिमेचा प्रारंभ केला.

या ट्विटसोबत जोडलेल्या मोहिमेशी संबंधित ध्वनिचित्रफितीमध्ये म्हटले आहे, की ‘‘ मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना बरबाद करणारी धोरणे राबवीत आहे. याआधी शेतकऱ्यांची जमीन बळकावणारा अध्यादेश आणला होता, तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने  शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार परत मिळवून दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या हितावर भाजप सरकारने हल्ला चढविला असून त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस  लढण्यासाठी तयार आहे. शेतकरी विरोधातील तिन्ही काळे कायदे मागे घेतले जावेत.’’

संबंधित बातम्या