मुख्यमंत्री करणार असाल तरच बोला

Avit Bagle
बुधवार, 15 जुलै 2020

पायलट यांची पक्षश्रेष्ठींना अट, ७२ तासांची बोलणी निष्फळ

जयपूर

राजस्थानातील युवा नेते सचिन पायलट यांना पक्षामध्ये परत आणण्यासाठी काँग्रेसच्या सहा दिग्गज नेत्यांनी तब्बल ७२ तास केलेली त्यांची मनधरणी अखेर निष्फळ ठरली. कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला गेहलोत यांच्यासोबत काम करायचेच नाही, मुख्यमंत्रिपद देणार असाल तरच बोला, अशा अटी पायलट यांनी घातल्याने काँग्रेसश्रेष्ठींची कोंडी झाली. सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी, अहमद पटेल आणि पी. चिदंबरम यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी पायलट यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला पण सर्वांचेच प्रयत्न निष्फळ ठरले.
आता काही केल्या पायलट माघार घ्यायला तयार नाहीत असे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी रात्री त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पायलट यांना निमंत्रित करण्यात आले होते पण त्यांनी मात्र या बैठकीस येणे टाळले.

पायलट यांच्या जागी डोटासारा
काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांची जागा गोविंदसिंह डोटासारा हे घेतील. ते गेहलोत सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले डोटासारा गेहलोत यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात. सिकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड हा डोटासारा यांचा मतदारसंघ असून ते जाट समुदायातील प्रबळ नेते आहेत. आता पायलट यांच्याकडील जबाबदाऱ्या गोविंदसिंह यांच्याकडे सोपविल्या जाणार आहेत. दरम्यान याआधीच मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आणखी एक उपमुख्यमंत्री नेमायच्या तयारीत होते ही बाब पायलट यांना रुचली नाही आणि त्यांनी थेट पक्षाविरोधातच बंड केले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गांधी घराण्याचा विश्‍वास गमावला
सचिन पायलट यांनाही या बंडाची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली आहे. त्यांचे उपमुख्यमंत्रिपद गेलेच पण त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये पालयट यांचे स्थान अन्य नेत्यांप्रमाणे नव्हते. गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी- वद्रा यांच्या ते थेट संपर्कात असत. काँग्रेसमधील गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणूनही त्यांना ओळखले जात. या बंडामुळे पायलट गांधी कुटुंबापासून दुरावले आहेत.
सचिन पायलट हे वयाच्या २६ व्या वर्षी खासदार बनले, पुढे ३२ व्या वर्षी केंद्रीयमंत्री, वयाची ३४ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता चाळीशी गाठल्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. हे सगळे शक्य झाले ते सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या विश्‍वासामुळे. ‘‘ सोनियाजींच्या आशीर्वादाने पायलट यांना ही पदे मिळाली, आता तेच काँग्रेसचे सरकार पाडत असल्याचे पाहून आम्हाला दु:ख होत आहे.’’ अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

मित्रही नाराज
पायलट काँग्रेस पक्षातील त्यांच्या अनेक जुन्या मित्रांनाही मुकले आहेत. दानिश अबरार आणि रामनारायण मीना यांच्यासह २२ आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जाते. या मंडळींचा पायलट यांना पाठिंबा असला तरीसुद्धा भाजपमध्ये जाण्यास मात्र त्यांचा विरोध आहे. त्यामुळे ऐनवेळी पायलट यांचीच राजकीय कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुमत सिद्ध करा
पायलट गटाचे गेहलोत यांना आव्हान

सत्तेच्या रेसमध्ये पिछाडीवर गेलेल्या पायलट गटाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. पायलट यांचे समर्थक आणि माजी मंत्री रमेश मीना यांनी गेहलोत यांनी बहुमताची परीक्षा दिल्यानंतरच त्यांच्या पाठीशी नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट होईल असे म्हटले आहे. गेहलोत हे त्यांच्याकडे १०९ आमदार असल्याचा दावा करत आहेत पण त्यांची खरी ताकद विधिमंडळात दिसेल असेही मीना यांनी नमूद केले.

तातडीने बहुमत चाचणी घेतली जावी अशी आमची मागणी आहे. यामुळे सगळी स्थिती स्पष्ट होऊ शकेल. आमचा पाठिंबा हा पायलट यांना आहे.
दिपेंद्रसिंह शेखावत, आमदार काँग्रेस

मुख्यमंत्र्यांनी नेहमीच पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पूर्व राजस्थानने विकास व्हावा म्हणून काँग्रेसला कौल दिला होता पण त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. पक्षामध्ये सुधारणा व्हायला हवी अन्यथा २०२३ च्या निवडणुकीत पक्षाला केवळ अकराच जागा मिळतील.
मुरारीलाल मीना, आमदार काँग्रेस

सचिन पायलट यांच्यासाठी भाजपची दारे नेहमी खुली आहेत.
ओम माथुर, उपाध्यक्ष भाजप

पायलट यांना अपमानित होऊन काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले असून विधिमंडळात बहुमत चाचणी घेतली जावी अशी भाजपची मागणी नाही.

पी.एल. पुनिया, भाजप प्रदेशाध्यक्षा
 

संबंधित बातम्या