भारतात 'स्पुटनिक व्ही' लसीचं उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी लस निर्मितीचं ध्येय

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

भारतातील लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) वाढू लागला असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढत आहे. भारतीय कंपनी पॅनासिया बायोटेकने (Panacea Biotec)  रशियन (Russia) बनावटीच्या 'स्पुटनिक व्ही' (Sputnik V) या लसीचं उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडच्या मदतीने हे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. पॅनासिया कंपनी स्पुटनिक व्ही लसीचे वर्षाला 10 कोटी डोस तयार करणार आहे. पॅनासिया बायोटेक आणि आरडीआयएफनं लसीच्या निर्मितीसाठी करार केला आहे. त्या करारानुसार लसीची निर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार आहे. (Sputnik V vaccine production started in India The target is to produce 100 million vaccines a year)

हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) बद्दी येथील कारखान्यात पॅनासिया बायोटेक कंपनीने स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवण्यात येणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता तपासली जाणार आहे.

COVID-19: तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार नाही; एम्सच्या संचालकांची...

पॅनासिया बायोटेक कंपनीसोबत आम्ही भारतामध्ये स्पुटनिक लसीचे उत्पादन सुरु केले आहे. यामुळे देशातील कोरोना स्थितीशी लढण्यासाठी मदत होणार आहे. भारतामध्ये लसीची पूर्तता झाल्यानंतर इतर देशांमध्ये त्याची निर्यात केली जाणार आहे, असं आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल्ल डमित्रीव यांनी सांगितले आहे. ''स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने भारताला याचा चांगलाच फायदा होणार आहे. लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु झाल्यास पुन्हा सामान्य जीवन जगता येईल,'' असं पॅनासिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी सांगितले आहे.

कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डनंतर भारतात स्पुटनिक व्ही लसीला मान्यता देण्यात आली आहे. देशात कोरोना लसींचा तुटवडा पाहता स्पुटनिक व्ही लसीला परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने 12 एप्रिल 2012 रोजी या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर 14 मे पासून या लसीचा डोस दिला जात आहे.

संबंधित बातम्या