दिल्लीच्या रस्त्यांचा होणार कायापालट

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

दिल्लीच्या रस्त्यांची वारंवार होणारी दुरवस्था आणि धुळीमुळे होणारे प्रदूषण यावर मात करण्यासाठी दिल्लीत युरोपियन देशांच्या धर्तीवर रस्ते बनविण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यांची वारंवार होणारी दुरवस्था आणि धुळीमुळे होणारे प्रदूषण यावर मात करण्यासाठी दिल्लीत युरोपियन देशांच्या धर्तीवर रस्ते बनविण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गवत लावण्यात येणार असून धुळीचा त्वरित निचरा करण्यासाठी एक तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीवर पुढील १५ वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असेल. 

दिल्ली परिक्षेत्रात ५०० किलोमीटरचे रस्ते आहेत. या प्रकल्पात चाचणी तत्त्वांवर सात रस्त्याची मार्च २०२१ अखेरपर्यंत फेररचना करण्यात येणार आहेत. चांदणी चौकाप्रमाणेच तेथेही रुंदीकरणाचे काम होईल. हा प्रकल्प खासगी-सहकारी भागीदारीतून बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) या पद्धतीने पूर्ण केला जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची फेरबांधणी करताना आजूबाजूची एक इंच जमीनही रिकामी राहणार नाही या पद्धतीने ते बनविले जातील. रस्त्यालगत साचणाऱ्या धुळीचे प्रमाण जवळपास संपुष्टात येईल. 

दोन्ही बाजूला ‘ग्रीन बेल्ट’
रस्त्याच्या दोन्ही बाजूला ग्रीन बेल्ट म्हणजे गवताचे पट्टे निर्माण केले जातील. झाडेही लावली जातील. एखादा रस्ता रुंद केला की त्यावर वाहनांचा दबाव अचानक वाढतो व वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी या प्रकल्पातील सारे रस्ते एकसारखेच रुंद बनविले जातील. रस्त्यालगतचे पदपथ ५ ऐवजी १० फूट रुंद असतील. दिव्यांग, पायी जाणारे, सायकलस्वार या साऱ्यांसाठी सुविधाजनक अशी रस्त्यांची रचना असेल. नव्या रचनेत ऑटोरिक्षा पार्किंगसाठी जागा निश्‍चित केलेल्या असतील. सायकल लेन वेगळ्या राहतील.

संबंधित बातम्या