बेफिकिरी नको, कडक उपाय करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितले. लस वितरणाबाबत राष्ट्रीय पातळीवर विशेष रणनीती तयार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली :‘‘कोरोनावरील लस कधी उपलब्ध होणार याची कोणालाच नक्की कल्पना नाही. ते वैज्ञानिकांच्या हाती आहे. मात्र आता लोकांमध्ये कोरोना विषाणू कमकुवत होत असल्याची व काहीशी बेफिकिरीची भावना बळावली आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी यापुढेही आरोग्य नियमांचे अत्यंत कडकपणे पालन करणे चालू ठेवावे व त्यात अजिबात ढिलाई देऊ नये,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितले. लस वितरणाबाबत राष्ट्रीय पातळीवर विशेष रणनीती तयार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

काही राज्यांत कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा विक्राळ रूप धारण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासह सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. लसीच्या वितरणाची प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाईल अशी हमी त्यांनी दिली. सकाळी साडेदहापासून सुरू झालेल्या व सुमारे साडेचार तास चाललेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही सहभागी झाले होते.

आगामी काळात दिल्ली, केरळ, महाराष्ट व राजस्थान या राज्यांनी विशेष दक्षता घ्यावी असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिला.
हरियानाचे मनोहरलाल खट्टर यांनी रूग्णांची आकडेवारी सांगण्यास सुरवात करताच मोदींनी, ‘मनोहरलालजी, हे आकडे साऱ्यांना माहिती आहेत. कोरोनाशी लढाईची रणनीती तुमच्या राज्याने काय केली हे सांगा,’ असे फटकारले. 
कोरोना लॉकडाऊनपासून पंतप्रधानांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची ही ९ वी बैठक होती. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या