बाघजन येथे ऑईल इंडिया लिमिटेडच्या वायूविहिरीत झालेल्या स्फोटाबाबतचे निवेदन

Pib
गुरुवार, 11 जून 2020

ही वायूविहीर दिब्रु-सैखोवा राष्ट्रीय उद्यान आणि मंगुरी मोटापुंग बील या पाणथळ जागेच्या परिसरात आहेत. या दोन्ही जागांवर या आगीचा पर्यावरणाच्या दृष्टीने घातक परिणाम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे काम ऑईल इंडियाने सुरु केले आहे.

 

 

 

 

 

 

मुंबई ,

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ऑईल इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या तीनसुखिया जिल्ह्यात बाघजन तेलप्रकल्पात बाघजन-5  या वायूउत्सर्जन विहीरीत 27 मे 2020 रोजी वर्कओव्हर ऑपरेशन्स सुरु असतांना ही विहीर अचानक सक्रीय झाली आणि त्यात स्फोट झाला. त्यामुळे या विहिरीतून मोठ्या प्रमाणात वायू उत्सर्जन सुरु झाले. ऑईल इंडियाने त्यावेळी ओएनजीसी कडे   मदत मागितली आणि ओएनजीसीने तात्काळ आपले आपत्ती व्यवस्थापन पथक मदतीसाठी पाठवले त्याशिवाय, ऑईल इंडियाने सिंगापूरची कंपनी मेसर्स अलर्ट डिझास्टर कंट्रोल यांचीही मदत घेतली.

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, ही विहीर बंद करण्याची योजना होती आणि सुरक्षाविषयक आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन,हे काम केले जाणार होते. या वायूविहीर स्वच्छ करण्याचे काम सुरु असताना, 9 जून 2020 रोजी दुपारच्या सुमाराला, या विहिरीत आग लागली आणि ही आग विहिरीच्या आसपास 200 मीटर्स परिसरात पसरली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांसह काल या सर्व घटनेचा आढावा घेतला. त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून ऑईल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दुर्घटनेत झालेली जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी मदत केली जावी अशी मागणी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यावर, आसाम सरकारला याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि ऑईल इंडिया लिमिटेड कडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले. राज्य सरकारने निश्चित केल्यानुसार, बाधित कुटुंबाना मदत आणि नुकसानभरपाई दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत, आज पुन्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, ऑईल इंडिया लिमिटेड आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. आतापर्यंत विहिरीच्या काठाच्या आजूबाजूचा भाग सोडल्यास, बाकी ठिकाणची आग विझवण्यात यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, ही विहीर बंद करेपर्यंत विहिरीच्या मुखाजवळ वायू जळतच  राहील, असेही सांगण्यात आले.

200 मीटर्स परिसरात पसरलेल्या आगीत 15 घरे पूर्णपणे जाळून गेली आहेत, तर इतर 10 ते 15 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या आगीत ऑईल इंडिया लिमिटेड च्या दोन फायरमेनचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तीन फायरमेन यावेळी घटनास्थळी होते, त्यापैकी, ओएनजीसीच्या फायरमनने जवळच्या पाण्याच्या टाकीत उडी मारली. हा कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र ऑईल इंडियाच्या कर्मचाऱ्यांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला.  विहिरीच्या आसपासच्या जळलेल्या सर्व वस्तू आणि उपकरणे बाजूला करुन परिसर स्वच्छ केल्यानंतरच विहीर बंद करण्याचे काम सुरु केले जाईल. या परिसरात सातत्याने पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. हे संपूर्ण ऑपरेशन पुढचे 4 आठवडे चालू शकेल.

या परिसरातील सुमारे हजार कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने सर्व बाधित कुटुंबांना प्रत्येकी 30,000 रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

 

संबंधित बातम्या