फक्त ठाम राहा, विजय आपलाच

PTI
बुधवार, 22 जुलै 2020

कॉंग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांचा विश्वास

जयपूर

राजस्थानातील राजकीय नाट्य रोज नवी वळणे घेत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मात्र त्यांचा बालेकिल्ला मजबूत ठेवलेला दिसून येतो. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत गेहलोत यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. मागील दहा दिवसांतील ही कॉंग्रेसची चौथी बैठक आहे. सध्या देशात काय सुरू आहे हे आपण सर्वचजण पाहत आहोत. पर्वतासारखे उभे राहिलो तर विजय आपलाच होईल. भाजप असो अथवा कॉंग्रेस आजच्या घडीला निवडणुका कोणालाच नको आहेत असे गेहलोत यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
लोकांच्या मनातील तुमच्याप्रतीचा आदर हा कैकपटीने वाढला असून ही काही सामान्य बाब नाही. आजही तुमच्या सगळ्यांकडे फोन असून आपल्या पक्षात कुणावरही कसल्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नाही, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले. या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्ष प्रभारी उपस्थित होते. यामध्ये अविनाश पांडे, के.सी.वेणुगोपाल, अजय माकन, रणदीप सुरजेवाला, विवेक बन्सल आदींचा समावेश होता.

गेहलोत यांच्या सहाय्यक अधिकाऱ्याची चौकशी
पोलिस अधिकारी विष्णूदत्त विष्णोई यांच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विशेष सहाय्यक अधिकारी देवाराम सैनी यांची कसून चौकशी केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे एक विशेष पथक सध्या जयपूरमध्ये तळ ठोकून असून याबाबत आधीच काही लोकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. राजस्थानातील अस्थिर अशा राजकीय पार्श्वभूमीवर या सगळ्या घटना घटना घडत असल्याने संशय व्यक्त होतो आहे. याप्रकरणी सोमवारी कॉंग्रेसचे आमदार कृष्णा पुनिया यांचीही तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली होती.

पक्षाचा विश्वासघात करणारे लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत. राज्यात आमचे सरकार पाडण्याचे कारस्थान आखण्यात आले होते परंतु आम्ही ते हाणून पाडले. काही लोकांची वर्तणूक ही मुळातच निषेधार्ह आणि अस्वीकारार्ह आहे.
अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

संपादन - अवित बगळे
 

संबंधित बातम्या