कोरोनानं पुन्हा पसरले पाय; देशात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू

कोरोनानं पुन्हा पसरले पाय; देशात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू
Corona

देशात कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरवात केली आहे. सलग पाचव्या दिवशी देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 14,199 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1.10 कोटीच्या पुढे गेली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात 83 जणांना कोरोनाच्या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आणि देशातील एकूण मृत्यूची संख्या 1,56,385 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता पुन्हा एकदा प्रशासनाने कठोर निर्बंध लावण्यास सुरवात केली आहे. 

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आठवडाभर संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात अंशतः निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याशिवाय, पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनकडून घेण्यात आला आहे. तसेच रात्रीच्या वेळेस संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने राज्यात आरटी-पीसीआर चाचणीत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्यानंतर, महाराष्ट्रातील नागपूर मध्ये देखील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शनिवारी आणि रविवारी बाजारासहित अन्य गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. हा आदेश सात मार्च पर्यंत देण्यात आला आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाची नवीन 6,971 प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 21,00,884 वर पोहचला आहे. आणि 35 जणांचा मृत्यू मागील 24 तासांत झाला आहे. व महाराष्ट्रातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 51,788 वर पोहचली आहे. 

दुसरीकडे, दिल्लीत देखील कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर खबरदारी म्हणून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर देशातून कोरोनाची नवी स्ट्रेन येण्याचा धोका लक्षात घेऊन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कोरोनाच्या तपासणीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिवसाला सातशे ते आठशे जणांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. मात्र आता यात दहापटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटन, पश्चिम आशिया आणि युरोप मधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय, राजधानी दिल्लीत मेट्रो आणि सार्वजनिक बस सेवा पुढील दोन आठवड्यांसाठी मर्यादित क्षमतेने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     

याव्यतिरिक्त, कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी मॅरेज हॉलमध्ये मार्शल तैनात करण्याचा निर्णय कर्नाटक राज्यात घेण्यात आला आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी आज याबाबतची माहिती दिली. तसेच सभेला 500 हून अधिक जणांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय कर्नाटक मध्ये घेण्यात आला आहे. आणि फेस मास्क देखील अनिवार्य करण्यात आला आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com