भाजपचा आयटी सेल बदमाश : सुब्रह्मण्यम स्वामी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

भाजपच्या आयटी सेलवरून सोशल मीडियावर घाण पसरवली जात असून, अमित मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा सारा विभाग बदमाश तसेच धूर्त बनल्याची टीका भाजपचेच खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली.

नवी दिल्ली:  भाजपच्या आयटी सेलवरून सोशल मीडियावर घाण पसरवली जात असून, अमित मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा सारा विभाग बदमाश तसेच धूर्त बनल्याची टीका भाजपचेच खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली. स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘मालवीय यांना त्वरित पदावरून हटवा,’ अशी मागणी केली. 

‘आम्ही मर्यादा पुरुषोत्तमाचा पक्ष आहोत ना, की रावण व दुःशासनाचा? मात्र ‘एक मालवीय व्यक्तिमत्त्व’ सोशल मीडियावर सतत घाण व घाणच पसरवत आहे,’ असा जोरदार प्रहार करताना स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनाच निशाण्यावर घेतले आहे. मात्र मालवीय यांनी स्वामी यांना सायंकाळपर्यंत दिलेले नाही. भाजपचा आयटी सेल गेल्या सहा वर्षांपासून प्रचंड सक्रिय आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सलग दोन वेळच्या लोकसभा विजयांमध्ये मालवीय यांच्या नेतृत्वाखालील आयटी विभागाची भूमिका कळीची राहिल्याचे अनेक भाजप नेते मान्य करतात. मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांवर सोशल मीडियावरील ‘भक्तगण’ अतिशय खालच्या भाषेत टीका करतात अशा अनेक तक्रारी आल्या व येतही आहेत. मात्र खुद्द शहा यांनी भाजपाध्यक्ष असताना ‘सोशल मीडिया योद्धे’ अशा शब्दांत आयटी सेलचा गौरव केला होता. आता मात्र या आयटी विभागाचा काच व जाच खुद्द भाजपच्याच नेत्यांना असह्य होऊ लागल्याचे स्वामी यांच्या रूद्रावतारावरून दिसत असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. 

स्वामी यांनी अलीकडे घसरता सकल विकास दर व कंबरडे मोडलेली अर्थव्यवस्था याबाबत काही ट्‌विट केली आणि नंतर ते भाजप समर्थक ‘राष्ट्रवादी’ ट्रोल्सच्या थेट निशाण्यावर आले. त्यांच्यावर चिखलफेक झाल्याने दुखावलेले स्वामी यांनी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. 

संबंधित बातम्या