सुपरसॉनिक ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

भारतीय लष्कराने आज सकाळी साडेदहा वाजता अंदमान-निकोबार बेटांवरून या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्रासाठीचे लक्ष्य तेथील अन्य बेटावर होते.

नवी दिल्ली : ब्राह्मोस सुपरसॉनिक (स्वनातीत) क्रूझ क्षेपणास्त्राच्या जमिनीवर मारा करणाऱ्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी मंगळवारी करण्यात आली. भारतीय लष्कराने आज सकाळी साडेदहा वाजता अंदमान-निकोबार बेटांवरून या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्रासाठीचे लक्ष्य तेथील अन्य बेटावर होते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डिआरडीओ)ने विकसित केलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीचे अनेक प्रकार लष्करात समाविष्ट आहेत. अत्याधुनिक ब्राह्मोसचा पल्ला ४०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षापासून चीनबरोबर सीमेवर वाढत्या तणावामुळे ब्राह्मोसच्या चाचण्या सध्या घेतल्या जात आहेत. 

हे क्षेपणास्त्र किती सहजपणे लक्ष्याला भेदू शकते हे चाचण्यांमधून सिद्ध करण्यात येत आहे. ब्राह्मोसची निर्मिती भारताच्या ‘डिआरडीओ’ आणि रशियाच्या ‘एनपीओएम’ या संरक्षण संस्थाने एकत्रितपणे केली आहे.

अशी आहे ब्राह्मोसची नवीआवृत्ती...

  •     २९० किलोमीटरचा पल्ला
  •     हे ‘नॉन-न्यूक्लिअर’ क्षेपणास्त्र आहे.
  •     त्याचा कमाल वेग २.८ मॅक आहे. म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा साधारण तीनपट जास्त वेगाने उडू शकते
     

क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये...

  •     २१ शतकातील सर्वांत धोकादायक क्षेपणास्त्रांपैकी एक असलेले
  •     ब्राह्मोस कमाल चार हजार ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकते
  •   ब्राह्मोसमधील (BrahMos) ‘Brah’चा अर्थ ‘ब्रह्मपुत्र’ आणि ‘Mos’चा अर्थ ‘मॉस्क्वा’ आहे. ही नावे भारत व रशियातील नद्यांची आहेत. या नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून ‘ब्राह्मोस’ हे नाव तयार केले आहे. 
  •     ब्राह्मोस कोठूनही उड्डाण करू शकते. जमिनीवरुन हवेत मारा करणारे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्य भेदू शकतात.

संबंधित बातम्या