सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश

पीटीआय
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीची मुंबई पोलिसांकडे गुन्हा स्थांनातरित करण्याची मागणी फेटाळून लावत बिहार सरकारने केलेली सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली.

नवी दिल्ली/ पाटणा:  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीची मुंबई पोलिसांकडे गुन्हा स्थांनातरित करण्याची मागणी फेटाळून लावत बिहार सरकारने केलेली सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली. या निर्णयानंतर सुशांत सिंह याची बहिण श्‍वेता सिंह किर्ती यांनी ट्विट करत देवाचे आभार मानले आहे. त्यांनी म्हटले की, देवा तुझे आभार, आमची प्रार्थना ऐकली. खर तर ही आता सुरवात आहे. सत्याकडे जाणारे पहिले पाऊल आहे. सीबीआयवर पूर्ण विश्‍वास आहे, असे श्‍वेता सिंह किर्ती यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंहचे वडिल के.के.सिंह यांचे वकिल विकास सिंह यांनी न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली. सुशांत यांच्या कुटुंबीयाचा विजय आहे. या निर्णयाला आव्हान देता येईल, अशी कोणतीच संधी न्यायालयाने दिलेली नाही. 

यासंदर्भात कोणताही अन्य गुन्हा दाखल होत असेल तर त्याचीही सीबीआय चौकशी केली जाणार आहे. मृत्युशी निगडीत सर्व प्रकरणांची आणि घटनांची सीबीआय चौकशी करणार आहे, असे के. के. सिंह यांच्या वकिलांनी सांगितले. 

हा लोकशाहीचा विजय : गुप्तेश्‍वर पांडे
बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी सांगितले की, हा न्याय आणि लोकशाहीचा विजय आहे. आज आपल्याला न्यायधीशाच्या रुपातून अप्रत्यक्षपणे ईश्‍वराचे दर्शन होत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केले नाही आणि ही बाब संपूर्ण देशाने पाहिली. अर्ध्या रात्री एका आयपीएस अधिकाऱ्याला एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक देत क्वारंटाइन केले गेले. 

खात्यात गैरव्यवहार नाही
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बॅंक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे फॉरेन्सिक ऑडिटच्या (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवल्याचे आरोप केले होते. या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व व्यवहारांचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण केले होते. सोमवारी (ता. १७) हा अहवाल वांद्रे पोलिसांकडे सोपवण्यात आला. या अहवालामध्ये सुशांतच्या खात्यातून कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी आदेश दिला असल्याने त्यावर राजकीय भाष्य करणे योग्य होणार नाही. राज्याची न्यायव्यवस्था देखील देशात सर्वोत्कृष्ट आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. सर्वांना न्याय मिळायला हवा.- संजय राऊत, नेते शिवसेना

आम्ही मांडलेल्या सर्वच मुद्यांचा न्यायालयाने स्वीकार केला असून पाटण्यात याप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर देखील योग्य ठरविण्यात आला आहे. न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत.- ॲड. विकास सिंह, सुशांतचे वकील

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास अधिक बळकट होईल. हे प्रकरण आत्तापर्यंत कशापद्धतीने हाताळल्या गेले याचे महाराष्ट्र सरकारने आत्मपरीक्षण करावे.- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

रियाने ज्या पद्धतीने मुंबई पोलिस आणि सक्तवसुली संचालनालयास चौकशीसाठी सहकार्य केले तसेच सहकार्य ती सीबीआयला देखील करेल. या प्रकरणाध्ये सत्याचाच विजय होईल.- ॲड. सतीश मानेशिंदे,  रियाचे वकील

मी एवढा आनंदी का आहे, हे समजायला मार्ग नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सत्याचा विजय झाला आहे. १३० कोटी लोकांच्या भावनांचा विजय आहे. उशिरा का होईना, पण मनासारखे घडले आहे.  एकदा आपण रस्त्यावर आलो आहोत. मग कितीही अडथळे असले तरी विजय आपलाच होईल.- शेखर सुमन, अभिनेते.

संबंधित बातम्या