ममता बॅनर्जी यांना मोठा झटका; तृणमूलचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधीच तृणमूल काँग्रेसचे नेते पक्ष सोडायला लागले आहेत. यात आज एका नवीन नावाची भर पडली असून आमदार सुवेंदु अधिकारी यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधीच तृणमूल काँग्रेसचे नेते पक्ष सोडायला लागले आहेत. यात आज एका नवीन नावाची भर पडली असून आमदार सुवेंदु अधिकारी यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सुवेंदु पूर्व मिदनापूरच्या नंदीग्राम येथील आमदार आहेत. त्यांनी मागील महिन्यातच मंत्रिमंडळातूनही माघार घेतली होती. 

सुवेंदु हे मागील काही काळापासून पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात नव्हते. विशेष म्हणजे सुवेंदु हे ममता यांच्या खास व्यक्तिंपैकी एक होते. त्यामुळे हा पक्षाबरोबरच ममता यांनाही झटका मानला जात आहे. १९ नोव्हेंबर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे बंगाल दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच सुवेंदु यांनी राजीनामा दिल्याने राज्यात त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.

काय म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष? 

 भाजपचे मोठ-मोठे नेते त्यांच्या स्वागताच्या गोष्टी करत असल्याने सुवेंदु अधिकारी हे किती महत्वाचे नेते आहेत याचा अंदाज लावता येईल. 'हे तर होणारच होते', अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक दिलीप घोष यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर भाष्य केले. ते पुढे म्हणाले, 'अनेक आमदार याआधीच तृणमूलसोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तृणमूलमध्ये लोकशाही नाही. तसेच तेथे कार्यकर्ते आणि नेत्यांना सन्मान नाही. जे लोकांना बंगालमध्ये परिवर्तन आणि विकास अपेक्षित आहे ते आमच्या बरोबर येत आहेत.'    

याबरोबरच भाजप उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी म्हटले की, 'सुवेंदु यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच मी सांगितले होते की, ते तृणमूल सोडत असतील तर त्यांचे भाजपमध्ये स्वागत करताना मला आनंदच होईल. आज त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो.' तृणमूल काँग्रेस पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळत असून त्यांचे कित्येक कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे रॉय यावेळी म्हणाले. 

 

संबंधित बातम्या