कोरोना लसींची सर्वाधिक नासाडी करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू अव्वल; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 एप्रिल 2021

देशभरात 11 एप्रिलपासून कोरोना लसींचे तब्बल 45 लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरातून सरकारने केला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच माहिती अधिकार कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या अर्जामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात 11 एप्रिलपासून कोरोना लसींचे तब्बल 45 लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरातून सरकारने केला आहे. कोरोनाची लस वाया घालवण्यामध्ये देशातील पाच राज्ये आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

माहिती कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 10 कोटी 34 लाख कोरोना लसींचा वापर योग्यपध्दतीने करण्यात आला आहे. तर 44 लाख 78 हजार कोरोना लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत. एकूण पुरवठा करण्यात आलेल्या कोरोना लसींपैकी 23 टक्के लसींचे डोस वाया गेल्याची माहिती या आकडेवारीमधून समोर आली आहे.

कोरोना जनजागृती करण्यासाठी छत्तीसगड सरकारची आगळीवेगळी लसीकरण मोहीम    

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा योग्य पध्दतीने वापर न होता त्या वाया जात आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आरटीआय अर्जानुसार 11 एप्रिलपर्यंत 44 लाख 78 हजार कोरोना लसी वाया गेल्या आहेत. तामिळनाडूला पुरवठा करण्यात आलेल्या कोरोना लसींपैकी तब्बल 12.10 टक्के कोरोना लसी वाया गेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा, तिसऱ्या क्रमाकांवर पंजाब, तर चौथ्या क्रमांकावर मणिपूर आणि पाचव्या क्रमांकावर तेलंगणा राज्याचा क्रमांक लागतो. हरियाणामध्ये 9.74  टक्के पंजाबमध्ये 8.12 टक्के, मणिपूरमध्ये 7.80 टक्के, तर तेलंगणामध्ये पाठवण्यात आलेल्या लसींपैकी  7.55 टक्के लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत.
 

संबंधित बातम्या