राष्ट्रपतींचे आवाहन: शिक्षकांनी डिजिटल शिक्षणपद्धती आत्मसात करावी

वृत्तसंस्था
रविवार, 6 सप्टेंबर 2020

राष्ट्रपतींचे आवाहन; देशातील ४७ शिक्षकांचा गौरव

नवी दिल्ली:  शिक्षकांनी डिजिटल शिक्षणपद्धती आत्मसात करून त्याबद्दल विद्यार्थ्यांची रुची वाढवावी, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशातील ४७ शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये नगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे नारायण मंगलाराम आणि मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्र शाळेच्या संगीता सोहनी या महाराष्ट्रातील दोघांचा समावेश होता. दक्षिण गोव्यातील शासकीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिंधू प्रभुदेसाई यांनाही सन्मानित करण्यात आले. 

शिक्षकांनी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हेच शिक्षणाचे मुख्य अधिष्ठान असले पाहिजे, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, की शिक्षणातील डिजिटल माध्यमाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, हे कोविड-महामारीने साऱ्या जगाला दाखवून दिले. डिजिटल शिक्षणाचे कौशल्य शिक्षकांनी अधिकाधिक आत्मसात करून त्याचा प्रत्यक्ष वापर वाढविला पाहिजे. मोठी इमारत, महागडी शिक्षण साधने यामुळे कोणतीही शाळा घडत नाही तर निष्ठावंत व समर्पित शिक्षकांमुळेच त्या शाळेची ख्याती वाढते. कोविड काळात डिजिटल माध्यमातून शिक्षण देणे हाच प्रभावी मार्ग उरला आहे. शिक्षकांनी आपले डिजिटल कौशल्य अधिकाधिक विकसित करावे व विद्यार्थ्यांनाही त्याच माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद या वेळी म्हणाले.
 
गलराम व सोहनी 
नगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक म्हणून नारायण मंगलाराम यांची ओळख आहे. त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा लक्षणीयरीत्या अवलंब केला असून शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल केला आहे. भाभा अणुशक्ती केंद्रीय शाळा क्रमांक ४ च्या शिक्षिका संगीता सोहनी यांनी ‘हसत खेळत विज्ञान शिका,’ हा उपक्रम राबविला आहे.  

संबंधित बातम्या