"संघाचा उल्लेख 'परिवार' म्हणून करणार नाही"

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला आपण संघ परिवार म्हणणार नाही असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान देण्यावरुन राहुल यांनी संघावर निशाणा साधला आहे. या पुढे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला आपण संघ परिवार म्हणणार नाही असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघात महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नाही अशी टिका ट्विटरवरुन केलीय. ''माझ्या मते राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या संबंधित संघटनांना संघ परिवार म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवार म्हटलं की त्या ठिकाणी महिला आणि वयस्कर व्यक्तींचा सन्मान केला जातो. या व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना व्यक्त केली जाते. असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघामध्ये दिसून येत नाही. यामुळे यापुढे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नाही,'' असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Team will not be referred to as family)

उत्तरप्रदेशमधील ख्रिश्चन पाद्र्यांवर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप करत त्यांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. या घटनेचा राहुल यांनी विरोध केला असून हिंदू संघटनांनच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं असल्याचा आरोप त्य़ांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून प्रोपागांडा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री भूमीपुत्रच होणार; मोदींनी दिले आश्वासन

राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. महिनाभरापूर्वीच तामिळनाडूमधील थुतुकुटीमध्ये 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वंय़सेवक संघावर टिका केली होती. ''केंद्रातील मोदी सरकार घटनात्मक संस्थांना उध्वस्त करत आहे त्यामुळे नागरिकांना संसद आणि न्यायपालिकेवर विश्वास राहिलेला नाही.'' असं राहुल गांधी म्हणाले होते. देशाला एकसंध ठेवणाऱ्या निवडक संस्था संपवण्याचा पध्दतशीरपणे प्रयत्न केला जात आहे. ''लोकशाही अचानक मरत नाही, ती हळूहळू मरते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने संस्थात्मक संतुलन नष्ट केलं आहे,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. 
 

संबंधित बातम्या