नड्डांशी जाहीर चर्चेस तयार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

 राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर शनिवारी हल्ला चढविला.

पाटणा :  राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर शनिवारी हल्ला चढविला. ते म्हणाले की, आम्ही वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण ते भूतकाळाबरोबर चालत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर चर्चेस तयार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात राजकीय टीका-टीप्पणी जोरात सुरू आहे. मुझफ्फरपूर येथील सभेत बोलताना ते म्हणाले,‘‘शिक्षण, रोजगार, सिंचन आणि आरोग्य या बिहारच्या प्राथमिक गरजा आहेत. मात्र नितीश कुमार यावर कधीच बोलत नाहीत. वर्तमान आणि भविष्यातील जगणे सुखकारक करण्याचा विचार आम्ही करीत आहेत, पण मुख्यमंत्री भूतकाळातील दाखले देत आहेत.’’आमच्या सरकारमध्ये सुनावणी होईल आणि कारवाईही केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

सत्तेवर आल्यास १९ लाख रोजगार : जे पी नड्डा

बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा येत्या ३ नोव्हेंबरला होत असून भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पुन्हा आज कॉंग्रेस आघाडीवर टीका केली.  सोनेपूर येथील प्रचारसभेत त्यांनी कॉंग्रेसच्या महागठबंधनकडून बिहारच्या विकासाची हमी मिळणार आहे काय, असा सवाल केला. बिहारमध्ये एनडीए पुन्हा सत्तेवर आल्यास सुमारे २० लाख रोजगारनिर्मितीचे ध्येय असल्याचे नड्डा म्हणाले. नड्डा म्हणाले, की राजद हा राज्यात अराजकता माजवणारा पक्ष आहे, तर कॉंग्रेस हा देशविरोधी पक्ष आहे. या दोघांची बिहारमध्ये आघाडी आहे. अशा आघाडीकडून विकासाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. या वेळी नड्डा यांनी तुम्हाला कंदिल हवा की एलईडी असा सवाल नागरिकांना केला. बिहारमध्ये १९ लाख नोकऱ्या निर्मितीचे लक्ष्य असून त्यानुसार राज्यातील युवकांना रोजगार मिळणार आहे. राजदकडून जाहीरनाम्यात दहा लाख रोजगारनिर्मितीचे आश्‍वासन दिले आहे. 

संबंधित बातम्या