दिल्लीकरांना यंदा नोव्हेंबरमध्येच हुडहुडी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

राजधानी दिल्लीसह बहुतांश उत्तर भारतात यंदाच्या थंडीची पहिली लाट आली आहे. कोरोनाचा कहर झेलणाऱ्या दिल्लीत तर नोव्हेंबरमध्येच डिसेंबर-जानेवारीप्रमाणे अक्षरशः हुडहुडी भरली असून काल सकाळी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नवी दिल्ली :  राजधानी दिल्लीसह बहुतांश उत्तर भारतात यंदाच्या थंडीची पहिली लाट आली आहे. कोरोनाचा कहर झेलणाऱ्या दिल्लीत तर नोव्हेंबरमध्येच डिसेंबर-जानेवारीप्रमाणे अक्षरशः हुडहुडी भरली असून काल सकाळी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्लीत नोव्हेंबरमध्ये इतक्‍या कमी तापमानाचा हा गेल्या चौदा वर्षांतील विक्रम आहे. 

कोरोना लॉकडाउनपासून दिल्लीतील हवामाननाने यंदा वेगवेगळे विक्रम मोडण्याचेच मनावर घेतल्याचे दिसत आहे. तुलनेने कमी तीव्रतेचा उन्हाळा, अवकाळी पाऊस आणि पाठोपाठ नेहमीच्या आधीच थंडीची पहिली लाट हे चक्र दिल्लीसाठी वेगळे असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये दिल्लीचा पारा १० अंशांच्याही खाली जाण्याचा प्रसंग २००६ च्या २९ नोव्हेंबरला आला होता. त्यावर्षी ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद दिल्लीत झाली होती. यंदा नोव्हेंबरमध्ये केवळ एक दिवस, १६ नोव्हेंबरला तापमान १६ अंशांवर गेले होते. तो अपवाद वगळता सारा नोव्हेंबर १० किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाची दिल्लीत नोंद झाली आहे. केवळ नोव्हेंबरमध्येच नव्हे तर, मागच्या महिन्यातही दिल्लीत ५८ वर्षांमधील म्हणजे १९६२ नंतर प्रथमच किमान तापमानाचा विक्रम ( १६.९) तोडला गेला होता. 

 

संबंधित बातम्या