मंदिर प्राचीन संस्कृतीचे प्रतीक बनेल

अवित बगळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

पंतप्रधान मोदी यांना विश्‍वास; सर्वांचाच विकास करण्यावर भर

अयोध्या

‘दीर्घ प्रतिक्षा आता संपली आहे. अयोध्येत तयार होणारे मंदिर रामनामाप्रमाणेच भव्यदिव्य असेल. ते भारताच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असेल. हे राम मंदिर अनंत काळापर्यंत मानवतेला प्रेरणा देईल,’ असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात रामंमदिराच्या उभारणीचे महत्त्व सांगितले.
‘जय सियाराम’चा जयघोष करत पंतप्रधान मोदींनी मोजक्या संख्येने निमंत्रित केलेल्या साधु-संत आणि इतर प्रतिष्ठीत नागरिकांशी आणि दूरचित्रवाणीवरून सोहळा पाहणाऱ्या कोट्यवधी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘ हा अत्यंत भावनाप्रधान क्षण आहे. दीर्घ प्रतिक्षा संपली आहे. आज केवळ इतिहास घडत नसून, इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. अनेक खार, वानर अशा अनेक छोट्या घटकांनी जशी प्रभू श्रीरामाला मदत केली, त्याचप्रमाणे सर्वांच्या प्रयत्नांमुळे मंदिर उभारणी होत आहे. हजारो वर्षांपासून अस्तित्व मिटविण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण आमच्या मनात राम कायम राहिला. महात्मा गांधीजींनीही प्रभू रामाचे व्यक्तीमत्व आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. राम आमच्या मनामनांत आहे, तो आमच्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे हे राममंदिर रामनामाप्रमाणेच भव्यदिव्य असेल. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे ते प्रतीक बनेल आणि अनंत काळापर्यंत मानवतेला प्रेरणा देईल.’’
ज्या ज्या वेळी मानवाने रामावर विश्‍वास ठेवला, त्या त्या वेळी प्रगती झाली. आपण ज्यावेळी आपण न्याय मार्गापासून ढळलो, त्यावेळी विनाश झाला आहे, असे मोदी म्हणाले. प्रत्येकाच्या भावना लक्षात ठेवून, सर्वांचा विश्‍वास प्राप्त करून, सर्वांचा विकास करायचा आहे, असे सांगतानाच मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आणि आताही भारतीयांनी दाखवलेले सामंजस्य अभूतपूर्व होते, असे सांगितले.

मोदी उवाच
- प्रभू श्रीराम कर्तव्याचा पुतळा.
- रामाच्या मनात दुर्लक्षित घटकांबद्दल विशेष प्रेम होते. रामराज्य हे समानतेवर आधारित होते.
- भारतीय संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. कोट्यवधी भारतीयांच्या एकत्रित संकल्पाच्या शक्तीचे हे मंदिर मूर्तरुप ठरेल.
- राम मंदिरामुळे अयोध्येचे अर्थचक्र गतिमान होईल
- जगभरातील पर्यटक अयोध्येकडे आकर्षित होतील
- मंदिर हे भारताची परंपरा, भक्ती आणि राष्ट्रीय भावनेचे प्रतीक असेल.

‘ही नव्या भारताची सुरवात’
अयोध्येतील भूमिपूजन ही केवळ राममंदिराच्या उभारणीचीच नव्हे, तर नव्या भारताची सुरुवात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक महत्त्व भागवतांनाच होते.
भूमिपूजनानंतर झालेल्या भाषणात भागवतांनी ‘बौद्धीक’ घेतले. भागवत म्हणाले,‘‘ भारताचा ‘वसुधैव कुटुम्बकम’वर विश्‍वास आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्यावरच आमचा विश्‍वास आहे. आजचा कार्यक्रम ही नव्या भारताची सुरुवात आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी आपल्याला जो आत्मविश्‍वास हवा आहे, तो आता मिळाला आहे. मंदिर निर्मिती होत असतानाच आपल्या मनातील अयोध्याही विकसीत करणे आवश्‍यक आहे. माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आम्हाला हा संघर्ष तीस वर्षे चालेल, असे सांगितले होते आणि त्यासाठी संकल्प करण्यास सांगितले होते. तो संकल्प पूर्ण झाल्याचा आज आनंद आहे.’’ राममंदिरासाठी अनेकांनी बलिदान केले आहे. अनेक जण येऊ शकलेले नाहीत, कोरोना परिस्थितीमुळे अनेकांना निमंत्रण दिलेले नाही. अडवानीजी ही घरी बसूनच कार्यक्रम बघत आहेत. तरीही, जे प्रत्यक्ष उपस्थित नाहीत, ते सूक्ष्म रुपात हजर असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

एका बाजूला मोदी, दुसऱ्या बाजूला योगी, मग मंदिर आता पूर्ण होणार नाही तर मग कधी? अयोध्येत मंदिर व्हावे, ही भक्तांची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
- महंत नृत्यगोपाल दास, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष

पाचशे वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान मोदींमुळे हे शक्य झाले आहे. हे मंदिर केवळ रामाच्या महानतेचेच नाही, तर देशाच्या महानतेचे प्रतीक असेल.
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश

संबंधित बातम्या