Farmers Protest UP Gate : आंदोलनस्थळी आढळला संशयित;  युपी गेटवर तणाव  

Copy of Gomantak Banner  (68).jpg
Copy of Gomantak Banner (68).jpg

गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने युपी गेट येथे केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना, आंदोलन स्थळ खाली करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. तर भारतीय किसान युनियनचे नेते नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन स्थगित करण्यास नकार देत, आंदोलनाच्या ठिकाणावरून उठणार नसल्याचे म्हटले आहे. राकेश टिकैत यांनी काही लोक प्रशासनासोबत मिळाले असून, ते कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय आता कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन माघार घेणार नसल्याची माहिती राकेश टिकैत यांनी दिली आहे.  

प्रशासकीय अधिकारी अजय शंकर पांडे यांनी आज संध्याकाळी राकेश टिकैत यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांना नोटीस बजावून महामार्ग रिकामे करण्यास सांगितले होते. त्यानंतर राकेश टिकैत यांनी आपण अटक करून घेण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणावरून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र यानंतर भारतीय जनता पक्षाचे नंदकिशोर गुर्जर आपल्या समर्थकांसह आल्याचे कळल्यानंतर राकेश टिकैत यांनी अटकेला नकार देत उपोषण सुरु केल्याचे जाहीर केले.    

प्रशासकीय अधिकारी आणि भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यात चर्चा चालू असतानाच स्टेजजवळ पोहोचलेल्या संशयितास निदर्शकांनी पकडले. यानंतर राकेश टिकैत यांनी या व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. संशयित व्यक्ती आपल्या संघटनेचा सदस्य नसल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले असून, पकडलेली ही व्यक्ती काठी घेण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याने काहीतरी केले असते, असे राकेश टिकैत यांनी पुढे सांगितले. तसेच या  संशयित व्यक्तीने माध्यमांशी गैरवर्तन केले असल्याचे सांगत, जे वाईट हेतूने आलेले आहेत त्यांनी येथून निघून जावे, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. 

त्यानंतर, गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने यूपी गेटच्या ठिकाणी कलम - 144 लागू केली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर प्रशासनाने दिलेल्या अल्टिमेटम नंतर काही आंदोलनकर्त्यांनी जागा खाली करण्यास सुरवात केली आहे. यावेळेस आंदोलनकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात जाऊन आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता फार कमी आंदोलनकर्ते या ठिकाणी राहिले असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर आंदोलन करत असलेल्या राकेश टिकैत यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी शेतकरी शांततेने आंदोलन करत असताना, सरकार शेतकर्‍यांविरूद्ध कट रचून त्यांचा आवाज घोटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सरकारने वीज, पाणी बंद केले तरी आजूबाजूच्या गावातून मदत मिळेल असे ते म्हणाले.      

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com