भारत-चीन सैन्य स्तरावरील दहावी फेरी पार पडली; पॅंगॉन्गच्या माहितीची झाली देवाण-घेवाण   

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भारत आणि चीन यांच्या सैन्यातील कोअर कमांडर स्तरावरील बैठकीची दहावी फेरी आज पार पडली.

भारत आणि चीन यांच्या सैन्यातील कोअर कमांडर स्तरावरील बैठकीची दहावी फेरी आज पार पडली. व या बैठकीत पॅंगॉन्ग सरोवराच्या परिसरातील आघाडीवरच्या दोन्ही देशांच्या सैन्याच्या तुकड्या सुरळीतपणे मागे घेतल्याची माहिती भारत व चीनने एकमेकांना दिली असल्याचे समजते. भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाखच्या सीमारेषेवर मोठा संघर्ष झाला होता. आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच चिघळला होता. दोन्ही देशांनी आपापले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेवर आणून उभे केले होते. मात्र भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कोअर कमांडर बैठकीच्या नवव्या फेरीत दोन्ही देशांच्या सैन्यांनी पॅंगॉन्ग त्सो च्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागातून माघार घेण्याबाबत सहमती दर्शविली होती. व त्यानुसार दोन्ही देशातील सैन्य आणि टॅंक यांनी पॅंगॉन्ग त्सो च्या दक्षिण आणि उत्तरेकडील किनाऱ्यावरून मागे जाण्याची प्रकिया सुरु केली होती.  

संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांकडून भारताचे कौतुक; भारत कोरोनाच्या लढयातील...

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी 24 जानेवारी रोजी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोअर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली होती. त्यानंतर कोअर कमांडर स्तरावरीलच चर्चेची दहावी फेरी काल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीन बाजूच्या मोल्दो येथे झाली. या चर्चेत, पॅंगॉन्ग त्सो भागातील सैन्य माघारी संदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करण्यात आल्याचे भारतीय सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, पॅंगॉन्ग त्सो भागातील दोन्ही बाजूच्या सैन्याचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पश्चिमेकडील क्षेत्रातील उर्वरित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी देखील चर्चा झाली असल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे. 

पश्चिम क्षेत्रामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने अन्य मुद्द्यांविषयी भारत आणि चीन यांच्यात स्पष्ट आणि सखोल विचारांचे आदानप्रदान झाले असल्याची माहिती भारतीय सैन्याने आपल्या निवेदनातून दिली आहे. याव्यतिरिक्त, दोन्ही पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे महत्त्वपूर्ण सहमतीचे पालन करण्याला मान्यता दिली असल्याचे समजते. आणि संवाद सुरु ठेवून, जमिनीवरील परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी सहमती झाली असल्याची माहिती या निवेदनातून देण्यात आली आहे. त्यानंतर, या चर्चेत सीमाभागात एकत्रितपणे शांतता व शांती कायम ठेवण्यासाठी उर्वरित प्रश्नांचा परस्पर स्वीकार्य तोडगा स्थिर व सुव्यवस्थित रीतीने काढण्याचे दोन्ही देशांनी मान्य केला आहे. 

दरम्यान, यापूर्वी सहा नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची आठवी फेरी झाली होती. आणि या चर्चेत देखील दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर व्यापक चर्चा केली होती. तर, आतापर्यंत झालेल्या चर्चेत भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची जबाबदारी चीनवर असल्याचे म्हटले होते. याउलट, सातव्या फेरीच्या चर्चेत चीनने पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याच्या शिखरावरुन आधी भारताने सैन्य मागे घेण्यास म्हटले होते. पण यावर दोन्ही बाजुंनी एकाच वेळी सैन्य माघारी घेण्यासंबंधी भारताने चीनला ठणकावून सांगितले होते. व नवव्या फेरीत दोन्ही देशांनी यावर सहमत होत सैन्य माघार घेण्यास सुरवात केली होती. मात्र पॅंगॉन्ग त्सो भागातील सैन्य मागे घेण्यात आले असले तरी, काही ठिकाणी चिनी सैन्याने प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. लडाखच्या पूर्व भागातील देपसांग, राकी-नाला आणि डीबीओसारख्या इतर ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य अजूनही समोरासमोर उभे आहे.

संबंधित बातम्या