भारत आणि चीन यांच्या सैन्यातील चर्चेची दहावी फेरी उद्या पार पडणार 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाखच्या सीमारेषेवर मोठी धुमश्चक्री झाली होती. आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच चिघळला होता.

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाखच्या सीमारेषेवर मोठी धुमश्चक्री झाली होती. आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच चिघळला होता. दोन्ही देशांनी आपापले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेवर आणून उभे केले होते. मात्र भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कोर कमांडर बैठकीच्या नवव्या फेरीत दोन्ही देशांच्या सैन्यांनी पॅंगॉन्ग त्सो च्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागातून माघार घेण्याबाबत सहमती दर्शविली होती. व दोन्ही देशातील सैन्य आणि टॅंक यांनी पॅंगॉन्ग त्सो च्या दक्षिण आणि उत्तरेकडील किनाऱ्यावरून मागे जाण्याची प्रकिया सुरु केली होती. त्यानंतर आता भारत आणि चीन यांच्या सैन्यातील कोर कमांडर स्तरावरील चर्चेची दहाव्या फेरीतील बैठक उद्या शनिवारी पार पडणार आहे.  

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुमारे अडीच महिन्यांच्या अंतरानंतर 24 जानेवारी रोजी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली होती. त्यानंतर आता कोर कमांडर स्तरावरीलच चर्चेची पुढील दहावी फेरी उद्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीन बाजूच्या मोल्दो येथे होणार असल्याची माहिती लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या चर्चेत, पॅंगॉन्ग त्सो भागातील सैन्य माघारी घेतल्यानंतर उर्वरित वादग्रस्त भागातील सैन्य माघारीसंदर्भात चर्चा होणार आहे. 

भारतीय जवानही म्हणाले, "पावरी हो रहे हैं"... व्हिडिओ व्हायरल

भारत आणि चीन यांच्यातील वादग्रस्त सीमाभागातील सैन्य मागे घेण्याच्या संदर्भात भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी, दोन्ही देशातील लष्कराच्या आणि मुत्सद्दी पातळीवरील सतत चर्चेच्या अनेक टप्प्यांनंतर सीमारेषेवरील सैन्य माघारीबाबत प्रक्रिया होत असल्याचे सांगितले. याशिवाय देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत भारत आणि चीन यांच्यातील वादग्रस्त भागातील सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर पुढे बैठक होत राहणार असल्याचे नमूद केले होते. 

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सैन्य पातळीवरील चर्चेत पॅंगॉन्ग त्सो च्या भागातून सैन्य मागे घेण्यासंबंधित सहमती झाली होती. व त्यानुसार सैन्य मागे घेण्यास सुरवात झाली आहे. या चर्चेचे उद्दिष्ट पूर्व लडाखमधील संघर्षमय ठिकाणांमधून सैन्य मागे घेणे हे होते. तसेच या बैठकीनंतर भारतीय लष्कराने निवेदन जाहीर करताना, चर्चेची नववी फेरी सकारात्मक, व्यावहारिक आणि विधायक झाल्याचे म्हटले आपल्या निवेदनात म्हटले होते. याव्यतिरिक्त सीमाभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सेन्याच्या डीएस्कलेशनवर दोन्ही बाजूंच्या विचारांची देवाण-घेवाण झाली असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली होती.         

दरम्यान, यापूर्वी सहा नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची आठवी फेरी झाली होती. आणि या चर्चेत देखील दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर व्यापक चर्चा केली होती. तर, आतापर्यंत झालेल्या चर्चेत भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची जबाबदारी चीनवर असल्याचे म्हटले होते. याउलट, सातव्या फेरीच्या चर्चेत चीनने पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याच्या शिखरावरुन आधी भारताने सैन्य मागे घेण्यास म्हटले होते. पण यावर दोन्ही बाजुंनी एकाच वेळी सैन्य माघारी घेण्यासंबंधी भारताने चीनला ठणकावून सांगितले होते. याव्यतिरिक्त, पॅंगॉन्ग त्सो भागातील सैन्य मागे घेण्यात येत असले तरी, काही ठिकाणी चिनी सैन्याने प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. लडाखच्या पूर्व भागातील देपसांग, राकी-नाला आणि डीबीओसारख्या इतर ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य अजूनही समोरासमोर उभे आहे.         

संबंधित बातम्या