‘टेस्ला’ची कार नविन वर्षात भारतात

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

जगातील आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांची टेस्ला ही कंपनी पुढील वर्षीपासून भारतामध्ये गाड्या विकायला सुरवात करणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नवी दिल्ली: जगातील आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांची टेस्ला ही कंपनी पुढील वर्षीपासून भारतामध्ये गाड्या विकायला सुरवात करणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

एका माध्यम समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खुद्द मस्क हे सुद्धा भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे.

टेस्लाने तयार केलेली मॉडेल-३ ही कार सर्वप्रथम भारतीय रस्त्यांवर धावणार आहे. या नव्या कारसाठी जानेवारी-२०२१ मध्ये बुकिंग सुरू होईल. प्रत्यक्षात विक्री मात्र जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान मस्क यांनी याआधीच या कारच्या भारतातील प्रवेशाचे सूतोवाच केले होते. टेस्लाचे तिसरे मॉडेल हे ऑनलाइन पद्धतीने विकले जाणार असून त्यामुळे डीलरशिप आणि नोकर भरती यावर कंपनीला अधिक खर्च करण्याची आवश्‍यकता भासणार नाही. टेस्लाने शांघायमधील फ्लांटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारतामध्ये एखाद्या ग्राहकाने ही कार बुक केली तर त्याला मिळणारी गाडी ही थेट शांघायमधून येईल. या कारची शोरूम किंमत ५० लाखांच्या घरात असेल.

स्थानिकांना लाभ किती?
स्थानिक विक्रेत्यांना या गाडीचा थेट लाभ कितीप्रमाणात होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे पण मेक इन इंडिया प्रकल्पाला मात्र यामुळे बळ मिळू शकते. टेस्लाच्या आगमनामुळे भारतातील कार उद्योगामध्ये आमूलाग्र असा बदल होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या