मुंबई
कोरोना संसर्ग हा जगभरात सध्या मुख्य चिंतेचा विषय आहे. अनेक देश हा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत; मात्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तसेच व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जगातील १० ते १५ टक्के लोकसंख्या बाधित झाल्यास विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत झालेल्या संशोधनात एकूण लोकसंख्येपैकी ६० ते ७० टक्के लोकसंख्या बाधित झाल्यास हर्ड इम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र आता कोरोना विषाणू कमकुवत झाला असून केवळ १० ते १५ टक्के लोकसंख्या बाधित झाली तरी विषाणू दिवसेंदिवस आणखी कमकुवत होत जाईल. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. तसेच कोरोनावर लस बनवण्याची हीच योग्य वेळ आहे, असेदेखील संशोधकांनी सांगितले आहे. संशोधकांनी स्वीडन देशातील एकूण स्थितीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
कोरोना संसर्ग पसरल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन सुरू केले; मात्र स्वीडनने देशात लॉकडाऊन लागू केला नाही. परिणामी सुरुवातीला बाधित रुग्णांची संख्या वाढली. मृतांचा आकडाही मोठा होता. नंतर मात्र रुग्णांच्या संख्येत घट झाली. इतकेच नव्हे, तर मृतांचा आकडाही कमी झाला. आता दररोज केवळ १०० रुग्ण सापडत असून त्यातील पाचपेक्षा कमी लोकांचा मृत्यू होत आहे. संशोधकांनुसार स्वीडनमधील लोकांमध्ये आजाराविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती विकसित झाली आहे. त्यामुळे विषाणूही कमकुवत होत असून कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे.
वाढत्या संसर्गाबरोबर कोरोना कमकुवत
स्वीडन मध्ये ७.३ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित झाली, तेव्हा देशात ५,२८० मृत्यू झाले होते; मात्र १४ टक्के लोकांना संक्रमण होईपर्यंत मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे आता १० ते १५ टक्के लोकसंख्येत कोरोनाचा संसर्ग होत असल्याने विषाणूही आपली ताकद गमावत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
देशानुसार स्थितीत फरक
वाढत्या संसर्गाबरोबर स्वीडनमध्ये समूह प्रतिकारशक्ती वाढल्याचे उदाहरण स्पेनमध्ये मात्र लागू झाले नाही. युरोपमध्ये स्पेनला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे; मात्र सध्या स्पेनमध्ये केवळ पाच टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे; तर ९५ टक्के लोक या विषाणूच्या प्रति असंवेदनशील असल्याचे दिसून आले. त्यामुळे केवळ समूह रोगप्रतिकारशक्तीच्या बळावर कोरोना संक्रमणाचा सामना होऊ शकत नाही, असेही संशोधकांचे म्हण्णे आहे.
रोगप्रतिकारशक्ती कमी होते
किंग्ज कॉलेज ऑफ लंडनमधील संशोधकांनी यापूर्वी ९० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या प्रतिपिंडांचा अभ्यास करून त्यांच्यात होणाऱ्या बदलांबाबत निष्कर्ष नोंदवले होते. त्यानुसार केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये विषाणूला रोखू शकणारे प्रतिपिंड असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ६० टक्के रुग्णांमध्ये संक्रमणाच्या काही आठवड्यांनंतर विषाणूला प्रतिरोध करणारी प्रतिक्रिया नोंदवली गेली. तीन महिन्यांनंतर केवळ १६.७ टक्के रुग्णांनी कोरोना विषाणूला रोखू शकेल अशी प्रतिपिंडे कायम ठेवली. ९० दिवसांनंतर काही रुग्णांच्या शरीरात संशोधनापुरतेही प्रतिपिंड नव्हते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
दोन आठवडे विषाणू असतोच
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुढील दोन आठवडे विषाणू कायम असतो. त्यामुळे अन्य व्यक्तींनाही संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. एखादे संक्रमण पसरते तेव्हा शरीरात त्याला विरोध करणारे प्रतिपिंड तयार होतात. त्यामुळे आजाराचा धोका कमी होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.