'आंदोलनातून काही लोक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत'

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 7 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी केलेले ट्वीट त्यांना डिलीट करावे लागले होते. आता या आंदोलनाविषयी सनी देओल यांनीही हिंदीतून ट्विट केले आहे.

गुरूदासपूर- प्रसिद्ध अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. नवीन कृषी कायद्याप्रकरणी भाजप शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या हिताचा निर्णय घेईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 दरम्यान, भाजप प्रणित केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा आणल्याने पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या विविध सीमांवर अक्षरश: ठिय्या मांडला आहे.  हमी भावाच्या सुरक्षिततेची खात्री आणि हे कायदे देत नाहीत. तसेच ओपन मार्केट म्हणजेच मंडी यंत्रणेद्वारे कृषी क्षेत्रात बाहेरच्या गुंतवणूकदारांची संख्याही वाढून यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असे शेतकऱ्यांचे मत असून या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे.
 
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी केलेले ट्वीट त्यांना डिलीट करावे लागले होते. आता या आंदोलनाविषयी सनी देओल यांनीही हिंदीतून ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, 'हा शेतकरी आणि सरकार यांच्यामधील विषय असून काही लोक मात्र आंदोलनातून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यात मी माझ्या पक्षाच्या तसेच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. आमचं सरकार कायम शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करते. शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकार नक्की त्यांच्या हिताच्या निर्णयापर्यंत येईल. 
 
 पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिधूने शेतकरी आंदोलनावर घेतलेल्या पवित्र्यानंतर सनी यांनी सिधू याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी याबाबतही ट्विट करताना म्हटले आहे की, 'दीप सिधू हा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्या बरोबर होता. मात्र, त्यानंतर आम्ही एकत्र राहिलो नाही. आता तो जे काही बोलत आहे ते त्याचं वैयक्तिक मत आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.' 

दरम्यान, उद्या ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात भारत बंदचे आवाहन केले असून आंदोलनाचे लोण दिल्ली, हरियाणा तसेच पंजाबबरोबरच सबंध भारतभरात पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

 

संबंधित बातम्या