प्रतिकारशक्ती वाढीसाठी सकारात्मक विचार करा

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

ब्रह्माकुमारी शिवानी यांचे प्रतिपादन, www.waitt.in  संकेतस्थळाचे उद्‌घाटन

पुणे: आपण भावनिक आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकलो तर आपले मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी राहून, आपली एकूणच प्रतिकारशक्ती वाढेल. यासाठी सर्वांनी सकारात्मक गोष्टींचाच विचार करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिवानी यांनी वेबिनारमध्ये केले.  

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेच्या अंतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताण - तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाईनला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने समाजातील विविध घटकांसाठी मानसिक आरोग्य, ताण - तणाव व्यवस्थापन व समायोजन यावर आधारित सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येणाऱ्या मानसिक ताण - तणावाची परिस्थिती कशी हाताळावी तसेच ताण - तणावाचे व्यवस्थापन व समायोजन कसे करावे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, याविषयी त्या बोलत बोलत होत्या. 

आपण नकारात्मक गोष्टींचा विचार न करता, आपण केवळ सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर भावनिकदृष्ट्या चिंता, काळजी, भीती निर्माण होणार नाही. परिणामी आपले भावनिक आरोग्य सुरळीत होऊन, आपण भावनिक आत्मनिर्भर बनू आणि त्याचा परिणाम आपले मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. यासाठी आपण काही गोष्टी लक्षात घेणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, ब्रह्मा-कुमारी (बी. के) शिवानी यांच्या वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या हस्ते ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाईनच्या www.waitt.in या संकेतस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

वेबिनारचे प्रास्ताविक ‘सकाळ’ चे सहयोगी संपादक सुनील माळी यांनी केले.

पुढील पाच गोष्टींचा विचार केल्यास, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

  •   आपले मन शक्तिशाली आहे, असा सतत विचार करावा. 
  •     काहीही झाले तरी मी शांत राहीन किंवा स्वतःला शांत ठेवीन, चिडचिड व राग व्यक्त करणार नाही. 
  •     मी कोणत्याही परिस्थितीचा सामना निर्भय - निडर होऊन करीन. 
  •     मी माझे शारीरिक स्वास्थ्य निरोगी ठेवीन. 
  •     ईश्वरीय शक्ती मला, माझ्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना कायम आनंदी व निरोगी ठेवील, असा सतत विचार करणे.

संबंधित बातम्या