तिसरी ‘टू प्लस टू’ पुढच्या आठवड्यात

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान तिसरा ‘टू प्लस टू’ मंत्रिस्तरीय संवाद पुढील आठवड्यात मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दिल्लीत होईल. यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि सामरिक भागीदारीच्या करारांवर शिक्कामोर्तब होईल. 

नवी दिल्ली : चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान तिसरा ‘टू प्लस टू’ मंत्रिस्तरीय संवाद पुढील आठवड्यात मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दिल्लीत होईल. यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि सामरिक भागीदारीच्या करारांवर शिक्कामोर्तब होईल. 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर तर भारतातर्फे संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यात सहभागी होतील. दोन्ही देशांची ही तिसरी बैठक असेल. याआधी दिल्लीत २०१८ मध्ये त्यानंतर २०१९ ला वॉशिंग्टनमध्ये असा संवाद झाला होता. भारत अमेरिकेदरम्यान असलेल्या वैश्विक सामरिक भागीदारीमध्ये दोन्ही देशांमधील जनतेचा संपर्क वाढविण्यापासून ते माहिती, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रातील सहकार्यवृद्धीचाही समावेश होतो. त्यावर चर्चा होणे आणि अंतराळ संशोधन, संयुक्त युद्भाभ्यास, गुप्त माहितीचे आदानप्रदान, तसेच बीईसीए (बेसिक एक्स्चेंज अॅड कॉर्पोरेशन अॅग्रिमेंट) हे करार मार्गी लागणे अपेक्षित आहे.

बीईसीए करारामुळे भारताला अचूक मारा करणारे एमक्यू ९ बी हे ड्रोन मिळण्यातील अडथळे दूर होतील. चीनमध्ये उगमस्थान असलेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर अमेरिका आणि चीनच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. भारत – प्रशांत महासागर क्षेत्र आणि दक्षिण चिनी समुद्रात चीनी वर्चस्वाला पायबंद घालण्यासाठी आधीच दोन्ही देश क्वाडच्या व्यासपीठावर जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत एकत्र आले. तर युरोपातील देशांनीही क्वाडबाबत अनुकूल भूमिका घेतली असल्याने चीनची अस्वस्थता वाढली आहे. 

चीनच्या विस्तारवादावरही चर्चा होणार
भारत-अमेरिका दरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय ‘टू प्लस टू’ संवादामध्ये चिनी विस्तारवाद हा देखील मुद्दा चर्चेमध्ये राहील. मात्र, या संवादाबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज साप्ताहिक वार्तालापादरम्यान अधिक बोलण्याचे टाळले. ते म्हणाले की, ‘टू प्लस टू’ संवादामध्ये भारत आणि अमेरिकदरम्यान द्विपक्षीय हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. अमेरिकेचे मंत्रिद्वय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटतील.

संबंधित बातम्या