तीन देश ठरलेत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

ब्राझील, रशिया आणि भारतात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

मुंबई

जग टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधून खुले होत आहे तसा कोव्हिड- 19 संसर्ग फोफावत चालल्याचे चित्र आहे. गुरुवारपर्यंत जगातील 190 देशांत कोरोना रुग्णांची संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहोचली होती. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या देशांमध्ये आता रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे, परंतु सुरुवातीला अतिशय कमी रुग्ण असलेले ब्राझील, रशिया आणि भारत हे देश आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरले आहेत.
चीनमधील वूहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूसंसर्ग जगभरात पसरला. चीननंतर इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि इराण या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला. कोरोनामुळे इटलीत 34,167, स्पेनमध्ये 27,136, फ्रान्समध्ये 29,346, जर्मनीत 8763 आणि इंग्लडमध्ये 41 हजारांहून अधिक बळी गेले. या देशांत रुग्णसंख्येने सरासरी अडीच लाखांचा टप्पा गाठल्यानंतर कोरोनाचा फैलाव मंदावला. त्यानंतर अमेरिका, तुर्कस्थान या देशांत कोरोना झपाट्याने पसरला. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक म्हणजे 1,13,000 बळी गेले; तर 20 लाखांना बाधा झाली.
तिसऱ्या टप्प्यात ब्राझील, रशिया आणि भारत हे देश कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तान, चिली, मेक्‍सिको, सौदी अरेबिया, पेरू आदी देशांतही कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आठ लाखांवर पोहोचली आहे; तर रशियाने पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. भारतातही रुग्णसंख्या तीन लाखांवर गेली आहे. दरम्यान, अमेरिकेत एप्रिल आणि मे या महिन्यांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

जगात रोज दीड लाख रुग्णांची भर
22 जानेवारीला पहिल्यांदा कोरोनाचे 265 रुग्ण सापडले होते. फेब्रुवारीत दररोज सरासरी 2000 आणि मार्चमध्ये दिवसाला 74 हजारांच्या आसपास रुग्ण सापडायचे. एप्रिलमध्ये दररोज एक लाख नव्या रुग्णांची नोंद व्हायची. मे महिन्यात नव्या रुग्णांची संख्या दिवसाला लाखापर्यंत होती, परंतु जूनमध्ये ही संख्या दिवसाला सरासरी दीड लाखावर पोहोचली आहे.

जगातील नवे रुग्ण
गुरुवार : 1,43,161
बुधवार : 1,37,661
मंगळवारी : 1,14,460
सोमवार : 1,10,218

देश व सरासरी नवे रुग्ण
ब्राझील : 15 ते 30 हजार
अमेरिका : 10 ते 22 हजार
रशिया : 8 ते 10 हजार
भारत : 9 ते 10 हजार
ग्रेट ब्रिटन : 1500 ते 2000
इटली : 100 ते 300
स्पेन : 100 ते 200

 

संबंधित बातम्या