तीन दहशतवादी श्रीनगरमध्ये ठार

वार्ताहर
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

चकमकीत एका महिलेचाही मृत्यू; जवान जखमी

श्रीनगर:  शहरातील बाटमालू भागातील चकमकीत मारले गेलेले तीनही दहशतवादी दक्षिण काश्‍मीरमधील स्थानिक रहिवासी होते, अशी माहिती जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंह यांनी गुरुवारी दिली. काश्‍मीर खोऱ्यात या वर्षात आत्तापर्यंत ७२ कारवायांमध्ये १७७ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती त्यांनी दिली.

दिलबागसिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘बाटमालूत एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्याने काश्‍मीरचे पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पथकाने आज सकाळी त्या घराला वेढा घातला. शरण येण्याची संधी दहशतवाद्यांना दिली, पण त्याला प्रतिसाद न देता दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला. याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले तर ‘सीआरपीएफ’चा एक अधिकारी व एक जवान जखमी झाला. अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर आहे.’’ 

चकमकीत कौसर जान (वय ४५) या महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला ही दुर्दैवाची बाब असल्याचे सांगून तिच्या कुटुंबाबद्दल सिंह यांनी सहानुभूती व्यक्त केली. पत्रकार परिषदेला काश्‍मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार आणि ‘सीआरपीएफ’चे श्रीनगर विभागाचे महानिरीक्षक चारु सिन्हा हेही उपस्थित होते. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी दक्षिण काश्‍मीरचे रहिवासी होते. त्यांच्याकडून शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. चकमकीच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला होणे ही चुकीचेच असून असे घटना घडू नये, अशी अपेक्षा दिलबागसिंह यांनी या वेळी केली.

दहशतवादी कट उधळला
जम्मू जिल्हा पोलिसांनी आज डोमना उपविभागात दहशतवादी कारस्थान उधळून लावले. रायपेर खेडी येथील रहिवासी नझर हुसेन सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कारवाई करीत पोलिसांनी त्याला अटक करीत दहशतवादी कट उधळून लावला. 

पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार
जम्मू-काश्‍मीरमधील पूँच जिल्ह्यातील बालाकोट व मेंधर विभागातील नियंत्रण रेषेजवळील लष्कराच्या टेहळणी चौक्यांना लक्ष्य करीत पाकिस्तानी सैनिकांनी तुफान गोळीबार केला व उखळी तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनी त्याला तोडीस तोड उत्तर दिल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. आज सकाळी पावणेसातच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करीत गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानी सैन्याने या महिन्यात २४ वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.

ठार दहशतवादी

  • ७२ सुरक्षा दलांच्या कारवाया
  • १७७ एकूण संख्या
  • २२ विदेशी दहशतवादी

संबंधित बातम्या