चांदोलीतील वाघ पोचला दांडेलीत

अवित बगळे
शुक्रवार, 31 जुलै 2020

आंतरराज्य स्थलांतर : दोन वर्षात कापले 300 किलोमीटर अंतर

बंगळूर

कोरोनामुळे लोकांना राज्यांच्या सीमा ओलांडण्याची परवानगी नाही. मात्र, प्राण्यांवर तसे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. महाराष्ट्रातील एका वाघाने चक्‍क 300 किलोमीटरचा प्रवास करुन कर्नाटक गाठले आहे. चांदोलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा वाघ दांडेलीतील काळी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा वाघ (टी -31) 2018 मध्ये पहिल्यांदा कॅमेराबद्ध करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच मे 2020 मध्ये हा वाघ दांडेलीतील काळी व्याघ्र प्रकल्पात आढळून आला. एप्रिल ते मे 2020 दरम्यान हा वाघ वनाधिकाऱ्यांना अनेकदा दिसला. गेल्या दोन वर्षांत त्याने सुमारे 300 किलोमीटर अंतर कापल्याचे यावरुन दिसून येते. महाराष्ट्र व कर्नाटकातील या दोन व्याघ्र प्रकल्पातील अंतर सुमारे 225 किलोमीटर आहे. परंतु, खंडीत वनक्षेत्रामुळे त्याला जास्त अंतर कापावे लागले असावे, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दांडेली ते चांदोली अभयारण्याला जोडणारा एक कॉरिडॉर आहे. त्यात उत्तर कर्नाटक, गोवा व दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहे. वाघ, हत्ती व अन्य वन्यजीवांसाठी हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे, अनेक वन्यप्राणी या कॉरिडॉरचा उपयोग करतात. वाघानेही त्याच मार्गाने आपले घर बदलले आहे. 2020 पर्यंत काळी व्याघ्र प्रकल्पात सुमारे 25 प्रौढ वाघ आढळले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या व्याघ्र संवर्धनाचा हा परिपाक आहे. त्यामुळे, दांडेली ते चांदोली हा कॉरिडॉर वाघांसाठी आदर्श अधिवास ठरु शकतो, अशी माहिती काळी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक मारिया के. राजू यांनी दिली.

 

संबंधित बातम्या