वाघांच्या महासर्व्हेक्षणाची गिनिज बुकमध्ये नोंद

PTI
रविवार, 12 जुलै 2020

देशात तीन कोटीहून अधिक टिपली वन्य जीवांची छायाचित्रं

नवी दिल्ली

वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत भारताने अनोख्या रुपाने जागतिक विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट करण्याबरोबरच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. याबाबत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या कामातील हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. देशातील वन, जंगल, डोंगराळ भाग असे एकूण १ लाख २१ हजार ३३७ किलोमीटरचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यात २६ हजार ७६० जागांवर कॅमेरे लावण्यात आले. यात वन्यजीवांचे ३.५ कोटीपेक्षा अधिक फोटो टिपण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सर्व्हे मानला जात आहे. त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे.
दोन वर्षापूर्वीचे सर्व्हेक्षण
देशात सुमारे सव्वा लाख किलोमीटरचे सर्व्हेक्षण दोन वर्षांपूर्वीचे २०१८ चे आहे. त्याचा उलगडा गेल्यावर्षी तर जागतिक विक्रमाची घोषणा आता करण्यात आली. सर्व्हेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या २९६७ आहे. त्यांच्या पिलांना गृहित धरले नाही तर त्याची संख्या २४६१ होईल. २००६ मध्ये वाघांची एकूण संख्या १४११ होती. भारताने नऊ वर्षांपूर्वी सेंट पीटसबर्ग येथे २०२२ पर्यंत देशातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र ते अगोदरच पूर्ण केले. सध्या भारतात सर्वाधिक १४९२ वाघ तीन राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ठरवलेल्या कालावधीच्या चार वर्षे अगोदरच वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात आहे. आत्मनिर्भर भारताचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल.
प्रकाश जावडेकर, पर्यावरणमंत्री

गिनिज वर्ल्ड रिकॉर्डच्या संकेतस्थळावरील माहिती
सर्व्हेक्षण-२०१८-१९
कॅमेरा ट्रॅप: १४१ जागांवरील २६,८३८ ठिकाणी
सर्व्हेक्षणाची व्याप्ती: १,२१,३३७ चौरस किलोमीटर
वन्यजीवांचे छायाचित्र काढले: ३,४८,५८,६२३
वाघांची ओळख: २४६१ (पिलं वगळून)
अभ्यासाची व्याप्ती: ३८१,२०० चौरस किलोमीटर

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या