तिरुपतीमध्ये ५ ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाउन

आर. एच. विद्या
बुधवार, 22 जुलै 2020

बालाजीचे मंदिर दर्शनासाठी राहणार खुले

हैदराबाद

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांपैकी एक तृतीयांश संख्या तिरुपती शहरातील असल्याने तेथे पाच ऑगस्टपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन लागू केले आहे. संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
लॉकडाउनच्या काळात तिरुपती बालाजीसह सर्व मंदिरे खुली राहणार असली तरी तिरुपती ट्रस्टने ऑफलाइन दर्शन तिकीट व्यवस्था तात्पुरती बंद केली आहे. दर्शनासाठी आता केवळ ऑनलाइन तिकीट आरक्षण करता येणार आहे. शहरात एकूण ५६ वॉर्ड असून प्रत्येक ठिकाणी किमान २० ते ३० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून बाहेरील वाहनांसाठी शहराच्या सीमा बंद केल्या आहेत. केवळ मंदिराच्या वाहनांना परवानगी दिली आहे.

मंदिर बंद करण्याची मागणी
दरम्यान, तिरुपती मंदिराच्या १७० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंदिराच माजी मुख्य पुजारी श्रीनिवास दीक्षितुलु यांचे काल कोरोनामुळे निधन झाल्याने भाविकांसाठी मंदिर बंद करण्याबाबत कर्मचारी संघटना आग्रही आहे. मात्र ट्रस्टने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. केवळ ६० वर्षांवरील कर्मचारी व पुजाऱ्यांना मंदिरात येण्यास मनाई केली आहे.

संपादन- अवित  बगळे

संबंधित बातम्या