निवडणुका नाही तर कोरोनाशी लढण्याची वेळ: प्रशांत किशोर

PTI
रविवार, 12 जुलै 2020

बिहारच्या निवडणुका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित आहे, मात्र कोरोनामुळे निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.

नवी दिल्ली

सध्या कोरोना संसर्गाचे सावट असताना बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापत चालले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राज्याचा विकास आणि कोरोनावरील उपचारावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यादरम्यान रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मात्र ‘सध्याची वेळ विधानसभा निवडणुकीवर नाही तर कोरोनाशी लढण्याची आहे’, असा सल्ला मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिला आहे. एकेकाळी प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांचे निकटवर्ती होते.
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, देशातील अनेक राज्याप्रमाणेच बिहारमध्ये देखील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. मात्र सरकारी यंत्रणा आणि मनुष्यबळाचा मोठा भाग हा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. नितीशकुमारजी, सध्या निवडणूकांवर बैठका घेण्याची वेळ नसून कोरोनाशी सामना करण्याची वेळ आहे. निवडणुका लवकर घेण्याचा प्रयत्न करून आपण लोकांचे आयुष्य संकटात आणू नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. एकेकाळी जेडीयूचे निष्ठावंत असणारे प्रशांत किशोर यांची पक्ष आणि नितीशकुमार यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने हकालपट्टी करण्यात आली. बिहारच्या निवडणुका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित आहे, मात्र कोरोनामुळे निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही. भाजप आणि जेडीयूने बैठक घेऊन निवडणूकीसाठी तयार असल्याचे सांगितले होते. परंतु प्रशांत किशोर यांनी राजकीय हालचालींना आक्षेप घेतला आहे. सध्या बिहारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १४,५७५ वर पोचली असून त्यापैकी ११९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहा हजाराहून अधिक बरे झाले आहेत. राज्यात सध्या ४३४७ जणांवर उपचार सुरू आहेत.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या