"भाजपला तृणमूलची बी-टीम व्हायचं नाही"; ममता दिदींच्या चिंतेत वाढ
TMC goes to back foot as many leaders join BJP

"भाजपला तृणमूलची बी-टीम व्हायचं नाही"; ममता दिदींच्या चिंतेत वाढ

कोलकाता : भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगाल मध्ये सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.तृणमूल कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोन खासदार आणि तीन आमदारांनी पुन्हा बॅनर्जींची चिंता वाढविली आहे. पालन ​​येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दक्षिण 24 परगण्यातील काही नेते अनुपस्थित राहिले आहेत. या खासदार-आमदारांबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. मात्र, आता टीएमसी नेत्यांना पक्षात घेणे भाजप थांबवत असल्याचे भाजपने म्हटले आहे.गुरुवारी पक्षाच्या बैठकीत खासदार मिमी चक्रवर्ती आणि प्रतिमा मंडलसह आमदार जीवन मुखर्जी, देवश्री रॉय आणि मंतूराम पाखीरा हे  अनुपस्थित होते.

गुरुवारी गृहमंत्री अमित शहा आणि सीएम बॅनर्जी यांनी एकाच जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या.राज्यात निवडणुका होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच भाजपाने आपली सक्रियता वाढवायला सुरुवात केली आहे. गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा सतत पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. टीएमसी नेत्यांना भाजपमध्ये घेणे थांबविण्याच्या चर्चेवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी,"आम्हाला सत्ताधारी पक्षाची बी-टीम बनायचं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. ते म्हणाले,"आम्हाला तृणमूलची बी-टीम व्हायचं नाहीये, तृणमूलचे नेते, ज्यांची प्रतिमा खराब आहे किंवा बेकायदेशीर कामात गुंतलेले आहेत, अशांना आमच्या पक्षात घेण्याची आमची इच्छा नाही. आता चौकशीनंतरच इतर पक्षातील नेत्यांचा समावेश करण्यात येईल,असे स्पष्ट केले आहे.

अलीकडेच डायमंड हार्बरचे आमदार दीपक हळदार, माजी मंत्री शुभेंदू अधिकारी आणि राजीव बॅनर्जी, टॉलीवूड अभिनेते यश दासगुप्ता, हिरण चटर्जी यांच्याशिवाय अर्धा डझन कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दोन वेळा टीएमसीचे आमदार चिरंजीत चक्रवर्ती यांनीही मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पत्राद्वारे पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की जर पक्षाने त्यांना निवडणुकीसाठी उभे केले नाही, तर ते राजकारण सोडतील. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 सदस्यांच्या निवडणुका यावर्षी एप्रिल-मेमध्ये होणार आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com