नक्षली म्होरक्या गणपती आत्मसमर्पण करणार

आर. एच. विद्या
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

गणपती याने आत्मसमर्पण केले तर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचा विचार त्याचे साथीदार करत आहेत. 

हैदराबाद: नक्षलवाद्यांचा प्रमुख नेता गणपती ऊर्फ मुप्पाळा लक्ष्मण राव आणि माल्लोजुला वेणूगोपाळ हे लवकरच तेलंगण पोलिसांपुढे आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगण्यात आले. 

महाराष्ट्र सरकारने गणपतीवर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे.

वृद्धत्वाबरोबरच आरोग्याच्या समस्यांमुळे हे दोन्ही नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत. याबाबत या दोघांचे साथीदार तेलंगण सरकारशी चर्चा करीत आहेत. प्रकृतीच्या कारणावरून गणपती (वय ७४) याने दोन वर्षांपूर्वीच नक्षलवादी पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता. या पदाची जबाबदारी त्याने ४३ वर्षे सांभाळली. दमा, गुडघेदुखी व मधुमेह अशा आजारांनी ग्रस्त गणपती याला संघटनेच्या बैठकीसाठी उचलून घेऊन जावे लागते. गणपती याने आत्मसमर्पण केले तर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचा विचार त्याचे साथीदार करत आहेत. 

नक्षलवाद्यांचा दुसरा प्रमुख नेता मल्लोजुला वेणूगोपाळ ऊर्फ भूपती हा आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तो नक्षलवादी पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा सदस्य आहे. गडचिरोलीत नक्षलवादी दंडकारण्य विभाग समितीचा तो अध्यक्ष होता. दंतेवाडामध्ये २०१० मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ७० जवानांना मारण्यात आले होते. यात वेणूगोपाळचा हात असल्याचा संशय आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण सरकारने त्याच्यावर बक्षिसे जाहीर केली होती.  

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या