भारताची चिनी ‘थिंक टँक’वर बारीक नजर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

चीनच्या विस्तारवादी धोरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या भारत प्रवेशावर यापुढे भारताची कडक नजर राहणार असून अशा व्यक्तींसाठी व्हिसा नियम कडक करण्यात आले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील चीनच्या आगळिकीनंतर भारत अत्यंत सावध झाला असून आता चीनमधील विचारवंत-सल्लागार (थिंक टँक) आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या भारतातील संस्था या भारतीय तपास संस्थांच्या रडारवर आल्या आहेत. चीनच्या विस्तारवादी धोरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या भारत प्रवेशावर यापुढे भारताची कडक नजर राहणार असून अशा व्यक्तींसाठी व्हिसा नियम कडक करण्यात आले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही महत्त्वाच्या देशांमधील विविध यंत्रणांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने चीन सरकारने विचारवंत, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक व्यापक यंत्रणा विकसित केली केल्याचे गुप्तचरांचे म्हणणे आहे. या त्यांच्या यंत्रणेत ‘थिंक टँक’, सांस्कृतिक आणि व्यापारी संस्था, सार्वजनिक धोरण गट आणि शैक्षणिक तज्ज्ञ यांचा समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अशा संस्था-संघटनांची यादी तयार केली आहे. या सर्वांवर आता भारत सरकारची नजर राहणार आहे. योग्य तपास करून सुरक्षिततेबाबतची मान्यता मिळवल्यावरच त्यांना व्हिसा मंजूर केला जाईल. रडारवर असलेल्या संस्थांनी पुरस्कृत केलेल्या व्यक्तींना सुरक्षिततेबाबतच्या सर्व निकषांची पूर्तता केल्याची खात्री करूनच व्हिसा द्यावा, अशी सूचना विदेशांमधील भारतीय दूतावासांना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या