त्रिपुराचे मुख्यमंत्री वादाच्या भोवऱ्यात

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

पंजाबी, हरियाणी जाटांपेक्षा बंगली बुद्धिमान असल्याचे वक्तव्य

नवी दिल्ली

वादग्रस्त विधानांमुळे कायम वाद ओढवून घेणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लबकुमार देव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हरियाणा आणि पंजाबच्या नागरिकांच्या बुद्धिमतेची तुलना त्यांनी पश्‍चिम बंगालशी केली आहे. या दोन्ही राज्यांपेक्षा पश्‍चिम बंगालमधील नागरिकांची बौद्धिकता अधिक चांगली असल्याचे बेताल वक्तव्य मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
देव हे भाजपचे नेते असून, ते राज्याच्या प्रमुख पदावर आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशांतील विविध समुदायांची वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला त्यांनी पंजाबमधील नागरिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. सरदार कोणालाही घाबरत नाहीत. ते खूप ताकदवान असतात; मात्र बुद्धिमान नसतात. ताकदीच्याबाबतीत त्यांच्याशी कोणीही जिंकू शकत नाही. त्यांच्याशी प्रेमानेच बोलवे लागते, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी हरियाणातील जाट समाजाची बंगालींशी तुलना केली. ते म्हणाले, "जाट समाज कमी बुद्धिमान असतो; मात्र त्यांची शारीरिकता चांगली असते. जाट बौद्धिकदृष्ट्या बंगालींशी तुलना करू शकत नाहीत. जगभरात हुशारीसाठी बंगाली लोकांची ओळख आहे, असे सांगून त्यांनी वादाला तोंड फोडले आहे.
देव यांच्या या बेताल वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी म्हटले आहे, की अशा बेताल वक्तव्यांमुळे देव यांची मानसिकता आणि विचार समजून येतात. हरियाणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत हे दोघेही आता गप्प का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष आता कुठे गेले आहेत? असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली.

मुख्यमंत्री देव यांचा माफीनामा
पंजाब आणि हरियाणाच्या नागरिकांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री देव यांनी यूटर्न घेतला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे दोन्ही राज्यांतील नागरिकांची माफी मागितली आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. मी बराच काळ या दोन्ही समुदायात घालवला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील माफ करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या