टीआरएस पक्षाची नागरिकांना मोफत पाणी देण्याबाबत आश्‍वासनाची खैरात

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

महानगरपालिकेत सत्ता आल्यास दर महिन्याला नागरिकांना वीस हजार लीटर मोफत पाणी देण्याचे आश्‍वासन टीआरएस पक्षाने दिलेले असताना आज तेलंगण कॉंग्रेसने ३० हजार लीटर मोफत पाणी देणार असल्याचे जाहीर केले.

हैदराबाद: महानगरपालिकेत सत्ता आल्यास दर महिन्याला नागरिकांना वीस हजार लीटर मोफत पाणी देण्याचे आश्‍वासन टीआरएस पक्षाने दिलेले असताना आज तेलंगण कॉंग्रेसने ३० हजार लीटर मोफत पाणी देणार असल्याचे जाहीर केले. बृहन हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांवर मोफत पाणी देण्याबाबत आश्‍वासनाची खैरात केली जात आहे. 

बृहन हैदराबाद महानगरपालिकेच्या प्रचाराला वेग आला असून आज कॉंग्रेसचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला.येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ४ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत.  तेलंगणचे प्रभारी मनिकाम टागोर यांनी जाहीरनामा जाहीर केला. त्यात अनेक आश्‍वासनं दिली आहेत.

हैदरबादमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्याचे कॉंग्रेसने जाहीर केले आहे. याशिवाय ज्या घराची पडझड झाली आहे त्याच्या दुरुस्तीसाठी घरमालकाला पाच लाख आणि किरकोळ हानी झालेल्या घरांसाठी अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त कुटुंबांना ५० हजाराची मदत दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. झोपडपट्टी भागात आणि दोन बेडरुम असलेल्या घराला शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल आणि त्यासाठी मोफतपणे आरओ प्रणाली बसवली जाईल. कोविड बाधित रुग्णांवर आरोग्यश्री योजनेतंर्गत उपचार केले जातील, तसेच आरोग्य विमा कवच, दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास या आश्‍वासनांचा समावेश आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या