ट्रम्प बिहारला विशेष दर्जा देणार नाहीत

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बिहारला येऊन विशेष राज्याचा दर्जा देणार नाही,’’ असे खोचक विधान करीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. 
 

पाटणा : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बिहारला येऊन विशेष राज्याचा दर्जा देणार नाही,’’ असे खोचक विधान करीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. 

 बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा जाहीरनामा शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला, शशिकांत गोहिल व अन्य नेते उपस्थित होते. तेजस्वी म्हणाले,‘‘ बिहारमध्ये दुहेरी इंजिनचे सरकार आहे. गेल्या १५ वर्षांपासून येथे नितीश कुमार यांचे राज्य आहे, मात्र तरीही बिहारला अजूनही विशेष राज्याचा दर्जा मिळालेला नाही. मोतिआरी साखर कारखान्याचा चहा पिणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५मध्ये म्हटले होते. पण आज बिहारमध्ये साखर, ताग, पेपर कारखाने, भात गिरण्या बंद असल्याचे दिसत आहे. एकही अन्न प्रक्रिया केंद्र उभारलेले नाही. गुन्हेगारी वाढलेली असून जेडीयू-भाजप सरकारने बिहारला मागे नेले आहे.’’
 

"तेजस्वीबिहारमधील ही निवडणूक नवी दिशा विरुद्ध दुर्दशा, नवा मार्ग विरुद्ध हिंदू-मुसलमान, युवा पिढी विरुद्ध अपयशी अनुभव किंवा स्वाभिमान विरुद्ध तिरस्कार अशी आहे."
- रणदीप सुरजेवाला,  काँग्रेसचे नेते 

यादव म्हणाले...
    नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.
    ‘प्रण हमारा संकल्प बदलाव का’ हे जाहीरनाम्याचे घोषवाक्य आहे.
    मी पक्का बिहारी असून माझा ‘डीएनए’ शुद्ध आहे.
    सत्तेवर आल्यानंतर दहा लाख युवकांना नोकऱ्या देणार
    नोकऱ्यांचे अर्ज मोफत असतील. 
    सरकारी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा खर्च आमचे सरकार करेल.
    राज्यात जागतिक दर्जाच्या मूलभूत सुविधा निर्माण करू
    शेतकरीविरोधी कायदे राज्यातून रद्द करण्याचे विधेयक मांडणार
    राज्याच्या अर्थसंकल्पातील १२ टक्के निधी शिक्षणावर खर्च करणार
    ‘स्मार्ट ग्राम योजने’अंतर्गत प्रत्येक पंचायतीत एक दवाखाना सुरू करणार. तेथे एक       डॉक्टर व परिचारिकेची नियुक्ती करण्यात येईल.

 

संबंधित बातम्या