आंध्रात वायुगळतीने दोघांचा मृत्यू

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

विशाखापट्टणजवळ दुर्घटना; अन्य चौघे आजारी

विशाखापट्टण

येथून जवळच असलेल्या परवाडा येथे औषधी कंपनीत बेनझिन वायुगळती झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण आजारी पडले आहेत. ही घटना आज पहाटे घडली. या घटनेनंतर कंपनी तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले आहे.
फार्मा सिटीतील सेनर लाइफ सायन्स युनिट येथे वायू गळती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर आजारी पडलेल्या चौघांवर गाजुवाका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी व्ही. विनयचंद आणि पोलिस आयुक्त आर. के. मीणा यांनी कंपनीला भेट दिली आणि परिस्थितीची माहिती घेतली. युनिटमधील संयत्रमध्ये झालेल्या वायुगळतीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींसाठी उपचाराची योग्य व्यवस्था करावी, असेही निर्देश दिले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेले कर्मचारी कंपनीतील ज्येष्ठ होते, असेही सूत्राने सांगितले. आज पहाटे वायुगळती होताच पाळी प्रमुख आणि केमिस्ट आजारी पडले आणि अन्य कर्मचाऱ्यांना श्‍वास घेताना त्रास होऊ लागला. ते दोघे अत्यवस्थ झाल्याने त्यांना दवाखान्यात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी विनय चंद यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली असून ती या घटनेची चौकशी करणार आहे. तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून सरकारने मृतांच्या नातेवाइकांना मदत करावी, अशी मागणी केली. स्थानिक आमदार ए. अदिप राज यांनी घटनास्थळी भेट दिली आणि व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा या घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप केला. काही वर्षांपूर्वी याच युनिटमध्ये अपघात झाला होता, तेव्हा तीन कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. तसेच दोन महिन्यांपूर्वी याच भागातील अन्य रासायनिक प्रकल्पात वायू गळती झाल्याने १२ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक आजारी पडले होते.

 

 

संबंधित बातम्या