दोन मीटरचे सोशल डिस्टन्सिंग अपुरेच

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

अमेरिकेतील संस्थेचा अभ्यास; वाऱ्याचा वेग महत्त्वाचा

मुंबई

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार विषाणूबाधेपासून वाचण्यासाठी खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून केवळ दोन मीटरचे अंतर पुरेसे नाही. ताशी चार किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोरोना विषाणू सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्‍सच्या वतीने फिजिक्‍स ऑफ फ्लुईड्‌स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे, की हवेची गती शून्य असताना माणसाच्या खोकल्यातून निघालेले तुषार दोन मीटरही लांब जाऊ शकत नाहीत; परंतु वाऱ्याचा वेग ताशी चार ते 15 किलोमीटर असल्यास हे तुषार सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात.
वाऱ्याचा वेग ताशी 15 किलोमीटर असल्यास खोकल्यातील थुंकीचे तुषार 1.6 सेकंदांत सहा मीटर दूर जाऊ शकतात. त्यामुळे विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दोन मीटरचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही. गर्दीच्या ठिकाणी याचा मोठा परिणाम होऊ शकतो. वाऱ्याचा वेग अधिक असताना घराबाहेर पडणे टाळायला हवे. विशेषत: पावसाळ्याच्या आधी वेगाने वारे वाहत असताना अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. फेस शिल्ड, हॅंड ग्लोव्हज घालणेही महत्त्वाचे आहे.

अधिक संशोधन आवश्‍यक
घरातील वातावरणात खोकला अथवा शिंकेतील तुषारांचा परिणाम वेगळा होऊ शकतो. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या वातावरणात आणि हवामानाच्या स्थितीत अधिक अभ्यास केला पाहिजे, असेही या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या