भारताच्या प्रजासत्ताक दिनाला ब्रिटनचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे; बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारले मोदींचे निमंत्रण

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

मोदी यांनी फोनवरून दिलेल्या औपचारिक निमंत्रणानंतर बोरिस यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी भारतात येण्याची तयारी दर्शवली आहे. ते 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निमंत्रणाचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वीकार केला आहे. मोदी यांनी फोनवरून दिलेल्या औपचारिक निमंत्रणानंतर बोरिस यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी भारतात येण्याची तयारी दर्शवली आहे. ते 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

आपल्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान जॉन्सन यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांनाही जी-7 परिषदेसाठी येण्याचे निंमत्रण दिले आहे. बोरिस जॉन्सन यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना आपला होकार कळवला आहे. ब्रेक्झिटनंतर प्रथमत:च भारतात ब्रिटनचा पंतप्रधान येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही यानंतर ब्रिटनला भारताबरोबरचे आर्थिक संबंध अधिक सक्षम करायचे आहेत, अशी आकांक्षा व्यक्त केली.    

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांच्यात दहशतवाद आणि कट्टरतावाद यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती दिली.        

संबंधित बातम्या