राममंदिराच्या गाभाऱ्याखाली ताम्रपत्र पुरून ठेवणार

पी. बी. सिंह
मंगळवार, 28 जुलै 2020

रामजन्मभूमी ट्रस्टचा निर्णय; मंदिराच्या इतिहासाची माहिती मिळणार

पाटणा

भविष्यात राम मंदिराबाबत कोणताही विवाद उद्‌भवू नये, यासाठी रामजन्माची माहिती असलेले ताम्रपत्र मंदिराच्या गाभाऱ्याखाली पुरून ठेवण्यात येणार आहे. यात रामजन्म आणि मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती असणार आहे, असे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले.
कामेश्वर चौपाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, "राम मंदिराबाबत प्रदीर्घ संघर्ष करावा लागला आहे. यामुळे सध्याच्या आणि भावी पिढीला एक नवा धडा मिळाला आहे. यामुळे राममंदिराच्या गाभाऱ्याखाली दोन हजार फूट खोल ताम्रपत्र ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही वाद उद्‌भवू नये. तसेच कोणाला राममंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास या ताम्रपत्राचा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास म्हणाले, की 5 ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंदिराची विट रचणार आहेत. या वेळी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संत उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्यात येणार आहे.

मुकेश अंबानी, गौतम अदानींची उपस्थिती
राममंदिर ट्रस्टने भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. पंतप्रधानांसह दोनशे जण या सोहळ्यात सहभागी होण्याचे नियोजन केले आहे. या लोकांचे चार गटात विभाज करण्यात आले आहे. यात देशातील कला, साहित्य, संस्कृती आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी उपस्थित राहणार आहेत.

व्हीव्हीआयपींना तीन नंबर गेटवरून प्रवेश
भूमिपूजनासाठी येणाऱ्या व्हीव्हीआयपी मान्यवरांना गेट नंबरचा मार्ग ठेवण्यात आला आहे. जवळपास 650 मीटरचा हा मार्ग आहे. तसेच भूमिपूजनासाठी लागणारे दगडही याच मार्गाने आणले जाणार आहेत. तसेच 5 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 15 मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला आहे. तसेच या वेळी नंदा, जया, भद्रा, रिक्ता, पूर्णा यांच्या शिलांचेही पूजन केले जाणार आहे.

मंदिर पेढीवर 11 हजार दिवे लावणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की राम मंदिराच्या पेढीवर 11 हजार दिवे लावण्यात येणार आहे. या दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या घरी दिवे लावून या सोहळ्यात सहभागी व्हावे. तसेच संतांनीही या सोहळ्याला अनावश्‍यक गर्दी करू नये. ज्यांना निमंत्रण आहे, त्यांनीच उपस्थित राहावे. या सोहळा जगात संस्मरणीय होणार आहे.

मुस्लिम कारसेवक घेणार जलसमाधी
5 ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला मुस्लिम कारसेवक आझम खान यांना निमंत्रण न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्ती केली. रामनगरी येथे आलेल्या आझम खान यांनी सांगितले की राम कोणत्याही एका जाती-धर्माचे नाहीत, ते दैवत आहे. कारसेवक असल्याने या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची मला संधी मिळावी. मात्र मला निमंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे या दिवशी तेथील नदीपात्रात जलसमाधी घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या