राज्यपालांवर केंद्राचा दबाव

PTI
शनिवार, 25 जुलै 2020

गेहलोत यांचा आरोप, विधिमंडळ अधिवेशनावर कॉंग्रेस ठाम

जयपूर

राजस्थानातील सत्तासंघर्षात न्यायव्यवस्थेने देखील पायलट गटाच्या बाजूने कौल दिल्यानंतर आता कॉंग्रेसनेही निर्वाणीचा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. राजस्थान विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज राज्यपाल कलराज मिश्रा यांनाच धारेवर धरले. राज्यपाल मिश्रा यांच्यावर केंद्राचा दबाव असल्यानेच ते विधिमंडळाचे अधिवेशन बोलाविण्यास टाळाटाळ करत असल्याची टीका गेहलोत यांनी केली आहे.
"राज्यपालांनी अधिवेशन बोलावले नाही तर जनताच राजभवनाला घेराओ घालेल, अशा स्थितीमध्ये काही विपरित घडले तर त्याला आम्ही जबाबदार नसू" असा स्पष्ट इशाराच गेहलोत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिला. आम्ही काल सायंकाळीच अधिवेशन बोलवा अशी विनंती राज्यपालांकडे केली होती पण त्याला राजभवनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अधिवेशन बोलावण्याची प्रक्रिया ही खूप साधी आणि सोपी असताना तिला विलंब का लावला जातो आहे हे आम्हालाही समजलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आजही आमच्याकडे पूर्ण बहुमत असून राज्यपालांनी सोमवारपासून अधिवेशन बोलवावे, त्यानंतर 'दूध का दूध आणि पानी का पानी' होईल असे गेहलोत यांनी सांगितले. राज्यामध्ये भैरोवसिंह यांचे सरकार पाडले जात असताना मी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो, असे करु नका अशी विनंती मी त्यांना केली होती. आताही आपण राज्यपालांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती तसेच त्यांना विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने घ्या अशी विनंती केली होती. आता आम्ही सगळेजण त्यांची भेट घेत त्यांना अधिवेशन घ्या म्हणून साकडे घालणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.

गेहलोत म्हणाले
आज (ता.२५) पासून अधिवेशन घेण्यावर आम्ही ठाम
बंडखोर आमदारांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये यायचे आहे
काही आमदार हरियानातील हॉटेलात कैद
आमच्यासमोर सर्व घटनात्मक, कायदेशीर मार्ग खुले
बहुमत हे कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या पाठीशी
पायलट यांच्या पक्षविरोधी कारवायांवर श्रेष्ठी नाराज
पायलट यांच्या घरवापसीबाबत श्रेष्ठीच निर्णय घेणार
राज्यातील घडामोडींमागे भाजपचाच हात
शेखावतांवरील कारवाईचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही

दिवसभरात

स. १०.४०ः राजस्थान उच्च न्यायालयात पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या याचिकेवरील सुनावणीला सुरवात. यात केंद्र सरकारला देखील पक्षकार करण्यात यावे अशी मागणी करणारे पायलट गटाचे आमदार पृथ्वीराज मीणा यांच्या याचिकेचा न्यायालयाकडून स्वीकार.
स. १०.५१ः न्यायालयाचे कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब
स. ११.२३ः पायलट यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले
दु. १२.२०ः मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल मिश्रांकडे भेटीसाठी वेळ मागितली, राज्यपालांनी साडेबाराची वेळ दिली
दु. १२.३०ः मुख्यमंत्री गेहलोत आणि काही आमदार राज्यपालांना भेटले, अधिवेशन घेण्याची मागणी
दु. १.३९ ः जयपूरमधील फेयरमॉंट हॉटेलात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु
दु.२.१३ः मुख्यमंत्री गेहलोत आणि त्यांचे समर्थक आमदार राजभवनाच्या दिशेने
दु.२.३०ः पक्ष प्रतोद महेश जोशी, वाहतूकमंत्री प्रतापसिंह खचरियावास राजभवनात
दु.३.०८ ः मुख्यमंत्री गेहलोत राज्यपाल कलराज मिश्रांना भेटले
दु.३.११ः विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी कॉंग्रेस आमदारांचे राजभवनासमोर आंदोलन, राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

म्हणून तरुण नेत्यांचे पलायनः चौधरी
कॉंग्रेस पक्ष आता लवकर सत्तेत येणार नाही असे वाटू लागल्यानेच अतिमहत्त्वाकांक्षी तरुण नेते हे पक्षाला सोडून जाऊ लागले आहेत, असे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना केले. या नेत्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान होणार असलेतरीसुद्धा ते तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. एखाद्या व्यक्तीला संतुष्ट करण्यासाठी पक्षाची विचारधारा आणि शिस्तीसोबत तडजोड केल्या जाऊ शकत नाही. अशा लोकांकडे फारशी वैचारिक बांधिलकी देखील नसते असे चौधरी यांनी स्पष्ट केले. ज्योतिरादित्य शिंदे असो किंवा सचिन पायलट या दोघांनाही पक्षाने भरभरुन दिल्याचा दावा त्यांनी केला.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या