गृहमंत्री अमित शाह आज बेळगावात ; महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट नाकारली

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा क्रीडांगणावर दुपारी चारला भारतीय जनता पक्षाच्या जनसेवक समारोप मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत.

बेळगाव :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा क्रीडांगणावर दुपारी चारला भारतीय जनता पक्षाच्या जनसेवक समारोप मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या बेळगाव दौऱ्यातील कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. याआधी मेळाव्यानंतर ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. मात्र, आता ते मेळाव्याआधी दुपारी साडेतीनला दिवंगत अंगडी यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

जनसेवक मेळाव्याआधी "केएलई''च्या कार्यक्रमात दुपारी ३.२० ला केंद्रीय गृहमंत्री शहा जाणार होते. आता हा कार्यक्रम मेळाव्यानंतर सायंकाळी ५.४० ला होणार आहे. नंतर ६.१५ ते ७.१५ पर्यंत केएलई शताब्दी महोत्सव सभागृहात होणाऱ्या पक्षप्रमुखांच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७.३०ला ते सांबरा विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत.

जनसेवक मेळाव्यास जिल्ह्यातून सुमारे तीन लाख कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे. या कार्यकर्त्यांच्या भोजनाची सोय फिनिक्‍स शाळा आवार तसेच अन्य ठिकाणी करण्यात आली आहे. गृहमंत्री शहा यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजपचे राजाध्यक्ष खासदार नलिनकुमार कटील यांच्यासह अन्य मंत्री मेळाव्यात सहभागी होणार आहेत. दरम्यान, मेळाव्याच्या तयारीबाबत नूतन मंत्री उमेश कत्ती यांनी आज सायंकाळी जिल्हा क्रीडांगणावर जाऊन पाहणी केली. आसन व्यवस्था, प्रवेशद्वार यासह अन्य व्यवस्थेची पाहणी करून त्यांनी आवश्‍यक सूचना केल्या. या वेळी आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील आदी उपस्थित होते.

समिती नेत्यांची भेट नाकारली

बेळगाव दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट नाकारली आहे. म. ए. समितीने सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शहा यांची भेट मागितली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ११ जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या कार्यालयाला पत्र लिहून भेट मागितली होती. परंतु, शहा यांनी समिती नेत्यांना भेट देण्याचे नाकारले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. देशाचे गृहमंत्री या नात्याने त्यांनी सीमावासीयांच्या व्यथा जाणून घेणे गरजेचे होते, असे मत सीमाभागातून व्यक्‍त होत 
आहे.

संबंधित बातम्या