केंद्रीयमंत्री शेखावत अडचणीत

PTI
शुक्रवार, 24 जुलै 2020

सहकारी सोसायटीतील गैरव्यहारप्रकरणी चौकशीचे आदेश

जयपूर

सहकारी पतपेढीतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत अडचणीत आले असून त्यांच्याविरोधात दाखल तक्रारींची पोलिस चौकशी करण्यात यावी असे निर्देश शहर न्यायालयाने राजस्थान पोलिसांना दिले आहेत. सध्या राज्यातील राजकीय रणधुमाळी शिगेला पोचली असताना शेखावत यांच्यामागे हा चौकशीचा ससेमिरा लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हा गैरव्यवहार तब्बल ८८४ कोटी रुपयांचा असून यामध्ये शेखावत यांच्या पत्नीचे देखील नाव आहे. संजीवनी क्रेडिट सोसायटी असे गैरव्यवहार झालेल्या
पतसंस्थेचे नाव असून मागील वर्षी गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. या सोसायटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रमसिंह यांना या आधीच अटक करण्यात आली होती. शेखावत आणि विक्रमसिंह हे दोघेही भागिदार आहेत. विशेष म्हणजे हा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर दोघेही विभक्त झाले होते. या सोसायटीचा वापर करून मोठी रक्कम शेखावत आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालकी असणाऱ्या कंपन्यांकडे वळविण्यात आली असा तक्रारदारांचा आरोप आहे.

पहिल्यांदा नाव नाही
या गैरव्यहारप्रकरणी २३ ऑगस्ट २०१९ रोजी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता पण त्यामध्ये मात्र शेखावत यांचे नाव नव्हते. त्यानंतर हे प्रकरण न्यायदंडाधिकाऱ्यांकडे गेले होते, तेव्हा सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणात शेखावत यांचे नाव जोडण्यास नकार दिला होता. पुन्हा ते जिल्हा न्यायालयामध्ये पोचले होते.

गैरव्यवहार कसा झाला
या सोसायटीने राजस्थानातील २११ आणि गुजरातमधील २६ शाखांच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून १ लाख ४६ हजार ९९१ गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम गोळा केली होती. पुढे काही लोकांनी सोसायटीच्या खात्यात हेराफेरी करून ५५ हजार लोकांकडून तब्बल १ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी असल्याचे दाखवून हेराफेरी केल्याचे उघड झाले होते.

ऑडिओ टेप खऱ्या ः गेहलोत
राज्यातील कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा कट आखला जात असून त्यासंदर्भात उघड झालेल्या ध्वनिफीती (ऑडिओ टेप) या खऱ्या आहेत असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज केले. आमच्याकडे विधिमंडळात पूर्ण बहुमत असून केंद्रीय तपास संस्थांनी घातलेल्या छाप्यांना आम्ही घाबरत नाही असे त्यांनी नमूद केले. " ज्यांचा आवाज त्या ऑडिओ क्लीपमध्ये आहे, त्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जाऊन भाषणे दिली असल्याने लोकांना त्यांचा आवाज चांगल्यारितीने ठावूक आहे. हीच मंडळी आता लोकांना देखील धमकावू लागली असून त्यांच्या या कारवाया फार काळ टिकणाऱ्या नाहीत. शेवटी विजय हा सत्याचाच होईल. विरोध करणाऱ्या मंडळींचा राजस्थान सरकारवर विश्वास नसेल तर आम्ही या टेप अमेरिकेतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत देखील तपासासाठी पाठवायला तयार आहोत," असे गेहलोत यांनी नमूद केले. आपण लोकशाही प्रक्रियेला अनुसरून पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे, आम्ही लवकरच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या